स्वस्तिक क्रीडा मंडळ, महात्मा गांधी स्पोर्ट्स अजिंक्य

मुंबई उपनगर कबड्डी संघटनेची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-२०२२.

मुंबई : मुंबई उपनगर कबड्डी संघटना आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुर्ल्यातील (पूर्व) स्वस्तिक क्रीडा मंडळाने प्रथम श्रेणी पुरुषांत, तर वांद्र्याच्या महात्मा गांधी स्पोर्ट्सने महिलांत अजिंक्यपद पटकाविले. कुर्ला(पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरीत संपन्न झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात स्वस्तिकने अंबिका सेवा मंडळाचा प्रतिकार ३९-२४ असा मोडून काढत विजेतेपदाचा मान पटकाविला. कुर्ल्यातील दोन संघातील लढत तशी एकतर्फीच झाली. पहिल्या सत्रात १७-०९ अशी आघाडी घेणाऱ्या स्वस्तिकने दुसऱ्या सत्रात देखील तोच जोश व संयम कायम राखत १५ गुणांच्या फरकाने बाजी मारली. आकाश रूडले याच्या धारधार चढाया त्याला अरकम शेखने भक्कम बचाव करीत दिलेली साथ यामुळे हा विजय सोपा गेला. अंबिकाच्या शुभम दिडवाघ, यश जगताप यांनी बऱ्यापैकी प्रतिकार करीत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात स्वस्तिकने ओवळी मंडळाचा ३७-२२ असा, तर अंबिकाने उत्कर्ष मंडळाचा ३३-२२ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.
महिलांच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधी स्पोर्ट्सने संघर्ष क्रीडा मंडळाचा संघर्ष ३७-१९ असा सहज संपुष्टात आणत विजेतेपदाला गवसणी घातली. महात्मा गांधीने या विजया बरोबर संघर्षाच्या सलग ४वर्ष विजयाची परंपरा पाचव्या वर्षी खंडित केली. मध्यांतराला २३-०७ अशी आश्वासक आघाडी घेणाऱ्या महात्मा गांधीने मध्यांतरानंतर सावध खेळ करीत विजय मिळविला. सायली जाधवचा अष्टपैलू खेळ त्याला स्नेहल चिंदरकरची मिळालेली चढाईची साथ यामुळे १८ गुणांच्या मोठ्या फरकाने हा विजय शक्य झाला. उत्तरार्धात संघर्षाच्या कोमल यादव, प्रणाली नागदेवता यांनी उत्कृष्ट खेळ करीत सामन्यात चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण संघाला विजय मिळविण्यात तो कमीच पडला.या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात महात्मा गांधीने स्वराज्य स्पोर्ट्सला ३१-२४ असे, तर संघर्षने नवशक्ती स्पोर्ट्सचा २८-२३ असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती.
व्यावसायिक पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात प्रोटेन होमने भाभा अणुशक्ती केंद्राला ३९-३६ असे पराभूत करीत अंतिम विजेतेपद मिळविले.

 175 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.