शेकडो विद्यार्थ्यांनी घेतली ठाणे शहर स्वच्छ ठेवण्याची शपथ


आपले घर स्वच्छ असले पाहिजे. तसेच शहरही स्वच्छ ठेवण्याची जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आली.

ठाणे : आपले शहर हे स्वच्छ व सुंदर असून आपले शहर बदलत आहे. शहरातील भिंती बोलायला लागल्या असून या भिंतीवर साकारण्यात आलेली चित्रे ही या शहराच्या संस्कृतीची प्रतिके आहेत, त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जशी महापालिकेची आहे तशीच ती सर्व नागरिकांची देखील आहे.  यावेळी विद्यार्थ्यांना ठाणे शहर अधिक स्वच्छ ठेवण्याची शपथ विद्यार्थ्यांना ठाणे स्मार्ट सिटी लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी यांनी दिली.
केंद्रसरकारच्या स्मार्ट सिटी सर्वेक्षणातंर्गत शहर नागरिक आकलन सर्वेक्षण सुरू आहे. या अंतर्गत विविध उपक्रम ठाणे शहरात राबविण्यात येत असून यामध्ये नागरिकांचा सहभाग घेतला जात आहे. याचाच एक भाग म्हणून  विद्यार्थी व तरुणांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून गडकरी रंगायतन येथे आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास ठाणे शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील जवळपास ७०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
शहर नागरिक आकलन सर्वेक्षणात शहराची स्वच्छता, वाहतूक सुविधा, शहरातील प्रदुषण, वैद्यकीय सेवासुविधा, शैक्षणिक सुविधा आदी विविध बाबींचा समावेश आहे. शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून यासाठी शहर अस्वच्छ करणाऱ्या व्यक्ती नजरेस पडल्या तर त्या व्यक्तींना स्वच्छतेचे महत्व पटवून देवून रस्त्यांवर थुंकू नका, कचरा टाकू नका असे सांगण्यास विसरु नका असा सल्लाही विद्यार्थ्यांना संदीप माळवी यांनी दिला. स्वच्छतेची सुरूवात ही आपल्यापासूनच करुन जसे आपले घर स्वच्छ असले पाहिजे. तसेच शहरही स्वच्छ ठेवण्याची जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आली.
स्मार्टसिटीच्या माध्यमातून शहरात विविध सेवासुविधा दिल्या जात आहेत. मासुंदा तलावाभोवती काचेचे फूटपाथ तयार करुन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, त्यामुळे या परिसराचे वेगळेपणे दिसून येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी यांनी दिली.
यावेळी मी माझ्या घरात, परिसरात, विभागात, शाळेच्या पटांगणात कचरा होवू देणार नाही. जे कचरा टाकतील त्यांना प्रतिबंध करणार, आपले ठाणे शहर स्वच्छतेत नंबर वन करण्याबाबत स्वच्छतेच महत्व इतरांना पटवून देणार अशी शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. तर वासुदेवाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. शहर नागरिक आकलन सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी http://eol2022.org या वेबसाईटशी संपर्क साधून ८०२७८७ हा ठाणे शहराचा कोड टाकून आपले मत व्यक्त करा असे आवाहनही यावेळी तरूणांना करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना सर्वेक्षणाची माहिती देणारी कापडी टोपी व पर्यावरणपूरक कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

 22,897 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.