साधना धारिया-श्रॉफ गौरव सोहळा
पुणे : महाराष्ट्रातील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कबड्डी खेळाडूंच्या ‘कबड्डी महायोद्धे’ या ग्रुपच्या विद्यमाने रविवार, १८ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजता पी.वाय.सी. हिंदू जिमखाना, भांडारकर रोड, पुणे येथे ‘महाराष्ट्राची कबड्डी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. कबड्डी खेळाचा व्यासंग असणारे साधना धारिया-श्रॉफ,चित्रा नाबर-केरकर (दोघी शिवछत्रपती पुरस्कार), अमरसिंह पंडित(उपाध्यक्ष-महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना), आस्वाद पाटील(सरचिटणीस- महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना), ई.प्रसाद राव तांत्रिक समिती प्रमुख- भारतीय हौशी कबड्डी महासंघ), जया शेट्टी(कबड्डी संघटक), अशोक शिंदे (अर्जुन पुरस्कार व भारतीय कबड्डी संघाचे निवड समिती सदस्य), प्रशांत केणी(जेष्ठ क्रीडा पत्रकार), मीनल पालांडे (शिवछत्रपती पुरस्कार), विश्वास मोरे(पंच समिती समन्वयक- भारतीय हौशी कबड्डी महासंघ) हे वक्ते महाराष्ट्राच्या कबड्डीविषयी विविध मुद्दय़ांवर संवाद साधणार आहेत.
याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व सध्या अमेरिकेत वास्तवास असलेल्या साधना धारिया-श्रॉफ यांचा गौरव करण्यात येणार आहे. याचप्रमाणे अन्य मान्यवरांचा सत्कारदेखील करण्यात येणार आहे. राज्यातील बहुसंख्य शिवछत्रपती पुरस्कारार्थी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व कबड्डीप्रेमी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. जेष्ठ खेळाडू व त्यांच्या खेळाची माहिती नवोदित खेळाडूंना व्हावी हाच या मागे हेतू आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी ‘कबड्डीचे १०० महायोद्धे’ हे पुस्तक क्रीडारसिकांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ‘कबड्डी युनिव्हर्स’ या यु-ट्यूब वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे, असे शांताराम जाधव व राजू भावसार यांनी पत्रकाद्वारे प्रसारमाध्यमांना कळवले आहे.
329 total views, 1 views today