अंतिम फेरीत कुमारांमध्ये ठाण्यासमोर पुण्याचे आव्हान

मुलींमध्ये उस्मानाबाद नाशिककरांना भिडणार
४८ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खोखो स्पर्धा, रायगड

रोहा रायगड : महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या मान्यतेने रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ४८ व्या कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत कुमार गटात ठाणे विरुद्ध पुणे तर मुलींमध्ये उस्मानाबाद विरुद्ध नाशिक असे अंतिम सामने होणार आहेत. धाटाव (ता. रोहा) येथील नथुराम (भाऊ) पाटील क्रीडानगरीत, परमपुज्य पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालय आणि एम. बी. मोरे फाऊंडेशन महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर सामने सुरु आहेत.
कुमारांचा ठाणे विरुद्ध उस्मानाबाद हा उपांत्य फेरीचा सामना प्रेक्षणीय झाला. ठाण्याने उस्मानाबादचा १९-१५ (मध्यंतर ११-९) असा ४ गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत स्थान पटकवलं. दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये आक्रमण आणि संरक्षण यांचा उत्तम ताळमेळ पाहायला मिळाला. ठाण्याचा मयुरेश मोरे (२, १.३० मि. संरक्षण ), सुरज झोरे (१.२०, १.५० मि. संरक्षण व ५ गुण ), रुपेश कोंढाळकर (१ मि. संरक्षण व ७ गुण ), वैभव मोरे (१.२०, १.४० मि. संरक्षण व २ गुण ) यांनी महत्वाची भूमिका बजावली. पहिल्या डावात उस्मानाबाद संघाने ठाण्याला चांगलेच झुंजवले मात्र दुसऱ्या डावात ठाण्याने सावरले. उस्मानाबाद तर्फे किरण वसावे (२.१०, २.१० मि. संरक्षण व १ गुण ), श्रीशंभो पेठे (१, १.१० मि. संरक्षण व १ गुण ), रवी वसावे (४ गुण ) यांनी चांगली लढत दिली.
कुमारांच्या अन्य उपांत्य लढतीत पुण्याने अहमदनगरचा १४-१० असा एक डाव ४ गुणांनी धुव्वा उडवला. पुणे संघाने नावाला साजेसा खेळ केला. पुण्याकडून विनायक शिंगाडे (२.३०, ३.१० मि. संरक्षण व १ गुण ), विवेक ब्राह्मणे (२ मि. संरक्षण व २ गुण), आकाश गायकवाड (१.२०, १.३० मि. संरक्षण व २ गुण ), देवांग गादेकर (२, २ मि. संरक्षण व २ गुण ) यांनी उत्कृष्ट खेळ करत नगरच्या खेळाडूंना संधी दिली नाही. नगरकडून अथर्व निकम (१ मि. संरक्षण व २ गुण ), शिवम नामदले (१.२० मि. संरक्षण ) यांनी चांगला खेळ केला.
मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात उस्मानाबादने ठाण्यावर १०-९ अशी ८.२० मि. राखून एक गुणाने दणदणीत मात केली. उस्मानाबादच्या अश्विनी शिंदे (४, ३.३० मि. संरक्षण व ४ गुण), सुहानी धोत्रे (१.२० मि. संरक्षण व ३ गुण ) तन्वी भोसले (१.५०, ३.३० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ करत मोठा विजय मिळवून दिला. ठाणेच्या दिव्या गायकवाड (१.३० मि. संरक्षण व १ गुण ), पायल भांगे (१.२० मि. व २ गुण) यांनी जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही.
मुलींच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात नाशिकने सांगलीवर चुरशीच्या सामन्यात १३-१२ (मध्यंतर ७-६) असा एक गुणाने निसटता विजय मिळवला. मध्यंतराला घेतलेली एक गुणाची आघाडीच नाशिकला तारुण गेली. नाशिकतर्फे सोनाली पवार (२.४०, १ मि. संरक्षण व १ गुण ), निशा विजल (१.४०, १.३० मि. संरक्षण), दीदी ठाकरे (१.३०, १.५० मि. संरक्षण व ३ गुण ), वृषाली भोमे (६ गुण ) यांनी जोरदार खेळाचे प्रदर्शन करत सांगली वर मात केली. त्यामुळे अंतिम सामन्यात पोचण्याची सांगलीचे स्वप्न अपूर्ण राहीले. सांगलीतर्फे प्रगती कर्नाळे (२.४०, १ मि. संरक्षण ), सानिया निकम (२ मि. संरक्षण व ४ गुण ) प्रतीक्षा बिराजदार (१.२०, २.४० मि. संरक्षण व १ गुण ) यांनी दिलेली निकराची लढत अपूर्ण पडली.

 208 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.