होतकरू, कुर्लाई स्पोर्ट्स, ऋषी वाल्मीकी यांची महिला गटात विजयी सलामी

राष्ट्रीय मिल मजदूर संघ “अमृत महोत्सवी वर्ष” राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष व स्थानिक महिला गट कबड्डी स्पर्धा-२०२२.

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या “अमृत महोत्सवी वर्षानिमित्त” आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत होतकरू संघ, कुर्लाई स्पोर्ट्स, ऋषी वालमीकी यांची स्थानिक महिला गटात विजयी सलामी. महात्मा गांधीच्या संमिश्र यशामुळे बाद फेरीचे चित्र बदलणार आहे. व्यावसायिक पुरुष गटात बँक ऑफ बडोदाचा एक विजय व एक पराभवाने देखील बाद फेरी गाठण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग. द. आंबेकर चषकाकरिता ना. म. जोशी मार्गच्या श्रमिक जिमखान्यावर सुरू झालेल्या महिलांच्या ड गटात ठाण्याच्या होतकरू संघाने मुंबई शहराच्या जिजामाता महिला संघाचा ३१-२६ असा पराभव करीत साखळीत विजयी सलामी दिली. मध्यांतराला २१-१३ अशा आघाडी घेणाऱ्या होतकरूने नंतर मात्र सावध खेळ करीत विजय साकारला. सायली शिंदे, वेदिका वाळवेकर होतकरूकडून, तर जिजामाताकडून प्रीती हांडे, योगिता राऊत उत्कृष्ट खेळल्या. पालघरच्या कुर्लाईने अ गटात पहिला साखळी विजय नोंदविताना मुंबईच्या विश्वशांतीला ३८-३१ असे नमविले. तृप्ती पाटील, रविना शेख, वैभवी यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. पराभूत विश्वशांतीकडून रोझी डिसोझा, काजल, विशाखा पाटील यांनी उत्तम प्रतिकार केला.
महिलांच्या अ गटात मात्र बलाढ्य महात्मा गांधी स्पोर्ट्सच्या पराभवाने बाद फेरीचे चित्र बदलले गेले. मुंबईच्या अमरहिंदने उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्टसला ३२-३१ असे साखळी सामन्यात पराभूत करीत कबड्डी रसिकांना सुखद धक्का दिला. शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात पहिल्या सत्रात महात्मा गांधींकडे १४-१३ अशी निसटती आघाडी होती. अमरहिंदच्या दिव्या यादव हिने केलेल्या धाडशी पकडी व उत्तम बचाव या विजयात महत्वाचा ठरला. तिला श्रद्धा कदमने चढाईत योग्य वेळी गुण घेत उत्तम साथ दिली. राष्ट्रीय खेळाडू सायली जाधव, तेजस्वी पाटेकर यांचा खेळ महात्मा गांधीचा पराभव टाळण्यात कमी पडला. याच गटात अगोदर झालेल्या सामन्यात अमरहिंदने ठाण्याच्या राजश्री शाहू संघाचा ४२-३४ असा पराभव केला होता. तर महात्मा गांधीने राजश्री शाहूचा ४०-२० असा पराभव केला होता. या अ गटातून अमरहिंद प्रथम, तर महात्मा गांधीने द्वितीय स्थान मिळवीत बाद फेरीतील आपले स्थान पक्के केले.
व्यावसायिक पुरुषांच्या ब गटात बँक ऑफ बडोदाने हिंदुजा रुग्णालयाला ३९-१९ असे पराभूत केले खरे, पण दुसऱ्या सामन्यात मध्य रेल्वे विभाग संघाने बँकेला ३३-३३ असे बरोबरीत रोखले. या बरोबरीनंतर देखील बँकेच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा जिवंत आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तदप्रसंगी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद शिंदे व लता भगत-पांचाळ, रेल्वेची राष्ट्रीय खेळाडू सुमती पुजारी, स्पर्धा निरीक्षक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संघटक मिनानाथ धानजी आदी मान्यवर उपस्थित होते.

 253 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.