ओम पिंपळेश्वर, महाराष्ट्र स्पोर्ट्स, वीर नेताजी, हिंदमाता, एफर्टस युनायटेड यांची विजयी सलामी

मुंबई शहर किशोर-किशोरी गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धा – २०२२-२३.

मुंबई : ओम पिंपळेश्वर, महाराष्ट्र स्पोर्ट्स, वीर नेताजी, हिंदमाता, एफर्टस युनायटेड यांनी मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या विद्यमाने आज पासून सुरू झालेल्या किशोर गटात विजयी सलामी दिली. वडाळा-मुंबईतील भारतीय क्रीडा मंदिराच्या भव्य पटांगणावर सुरू असलेल्या किशोर गटाच्या उदघाटनिय सामन्यात ओम पिंपळेश्वर-ब ने स्नेह सागराचा ६१-१५ असा धुव्वा उडवीत विजयी सलामी दिली. पहिल्या सत्रात ४०-०८ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या पिंपळेश्वरने दुसऱ्या सत्रात मात्र सावध खेळ करीत हा विजय साकारला. सर्वेश व रोहन या वाघेला बंधूंच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. स्नेह सागराचा स्वरूप धनावडे चमकला. महाराष्ट्र स्पोर्ट्सने चुरशीच्या लढतीत आंबेवाडीचा प्रतिकार ५२-४२ असा संपुष्टात आला. पहिल्या डावात दोन्ही संघ १९-१९ असे बरोबरीत होते. दुसऱ्या डावात महाराष्ट्र स्पोर्ट्सने टॉप गिअर टाकत आपल्या खेळाची गती वाढवीत १०गुणांच्या फरकाने सामना खिशात टाकला. अरुण सुतार, मानव कदम यांच्या चढाई-पकडीच्या सर्वोत्तम खेळाला या विजयाचे श्रेय जाते. अथर्व व आर्यन या देसाई बंधूनी आंबेवाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत कडवी लढत दिली.
आदित्य उतेकर, नारायण परब यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर शिवमावळे कबड्डी संघाने गोल्फादेवीचे आव्हान ५७-४९ असे संपविले. पहिल्या सत्रात ३०-२७ अशी नाममात्र आघाडी विजयी संघाकडे होती. गोल्फादेवी कडून प्रीतम शर्मा, स्वरूप गुरव यांचा खेळ संघाचा पराभव टाळण्यात कमी पडला. हिंदमाता संघाने वीर बजरंगला ५८-५३ असे नमवित विजय साकारला. पूर्वार्धात २६-२१ अशी आघाडी घेणाऱ्या हिंदमाताला उत्तरार्धात मात्र बजरंगने विजयासाठी चांगलेच झुंजवले. या डावात दोन्ही संघाना ३२-३२ असे समान गुण मिळविले. पण हिंदमाताने पहिल्या डावातील आघाडीवर बाजी मारली. आर्यन पुजारी, अल्पेश झोरे हिंदमाताकडून तर आर्यन घेवडे, आदित्य मोरे वीर बजरंगकडून उत्कृष्ट खेळले. एफर्ट्स युनायटेडने ओमकार जाधव, प्रणय सावंत यांच्या चतुरस्त्र खेळाच्या बळावर अशोक मंडळाचा ६०-५१असा पराभव केला. या सामन्यात देखील मध्यांतरातील २६-१७ अशा आघाडीवर एफर्ट्सने बाजी मारली. दुसऱ्या डावात दोन्ही संघाने ३४-३४ असे समान गुण घेतले. अशोक मंडाळच्या साईराज कदम, भूषण कविलकर यांना उत्तरार्धाच्या खेळात सूर सापडला.

 179 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.