वाडीवरवडे-कुडाळात रंगणार पुरुष गट कबड्डीचा थरार

हरी ओम् मंगल कार्यालयाच्या समोरील पटांगणावर “विठ्ठल कृष्णाजी धुरी चषकासाठी” हे सामने खेळविण्यात येतील.
कुडाळ : हरी ओम् मंगल कार्यालयाच्या विद्यमाने व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने शनिवार २६ व रविवार २७ नोव्हेबर असे दोन दिवस जिल्हा पातळीवरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग-कुडाळ-वाडीवरवडे येथील हरी ओम् मंगल कार्यालयाच्या समोरील पटांगणावर ” विठ्ठल कृष्णाजी धुरी चषकासाठी” हे सामने खेळविण्यात येतील. मातीच्या तयार करण्यात आलेल्या एका क्रीडांगणावर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत सिंधुदुर्गातील पंचक्रोशी-फोंडा, रेवताळे-मालवण, सिंधुपुत्र-कोळोशी, लक्ष्मीनारायण-वालावल-कुडाळ, गुडीपूर-कुडाळ, शिवभवानी आणि जय महाराष्ट्र-दोन्ही सावंतवाडी, जय मानसिश्वर-वेंगुर्ला, यंग स्टार-कणकवली आदी १६ नामवंत संघांना या स्पर्धेत सहभाग देण्यात आला आहे. सर्व सामने सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येतील. अजिंक्यतारा-वाडीवडवरे विरुद्ध जय गणेश पिंगुली या सामन्याने २६ नोव्हेबर रोजी सायंकाळी ५-३० वा. या स्पर्धेला प्रारंभ होईल.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला “स्व. विठ्ठल कृष्णाजी धुरी चषक” व रोख रु. सात हजार(₹७,०००/-), तर उपविजेत्या संघाला ” स्व. सत्यभामा विठ्ठल धुरी चषक” व रोख रु. पाच हजार(₹५,०००/-) प्रदान करण्यात येतील. दोन्ही उपांत्य उपविजयी संघांना प्रत्येकी चषक व रोख रु. तीन हजार(₹३,०००/-) पारितोषिका दाखल देण्यात येतील. स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेल्या खेळाडूस रोख रु.एक हजार पाचशे(₹१,५००/-), तर स्पर्धेतील उत्तम चढाई व पकडीच्या खेळाडूस प्रत्येकी रोख रु.एक हजार(१,०००/-) देण्यात येतील. शिवाय दिवसाच्या मानकऱ्यास रोख रु. एक हजार(₹१,०००/-) देण्यात येतील. स्पर्धेची तयारी जोरदार सुरू असून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संघटक मिनानाथ धानजी व राजेश सिंगनाथ स्पर्धेत कोणतीही कसर राहू नये म्हणून जातीने लक्ष ठेवून आहेत. याकरिता त्यांना स्थानिक कार्यकर्त्यांचे देखील मोठ्याप्रमाणात सहकार्य मिळत आहे. असे एका परिपत्रकाव्दारे स्पर्धा आयोजक बाळकृष्ण धुरी यांनी प्रसार माध्यमाना कळविले आहे.

 175 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.