मॅच विनर बना – दिलीप वेंगसरकर

ड्रीम ११ कप या १४ वर्षाखालील खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना युवा क्रिकेटपटूंना दिला सल्ला

मुंबई : तुम्ही कुठलाही सामना खेळत असलात तरी जोपर्यंत शेवटची धाव घेतली जात नाही किंवा शेवटची विकेट मिळत नाही तोपर्यंत हार किंवा जीत होत नाही, त्यामुळे फलंदाजी करीत असाल तर अन्य कुणी विजय मिळवून देईल या अपेक्षेवर न राहता तुम्हीच संघाला विजय पथावर नेण्याची कामगिरी करायला हवी. तुम्ही कायम मॅच विनर बनायला हवे. एका डावात शंभर धाव केल्या आणि नंतर तीन-चार डावात अपयशी ठरला तर अशा कामगिरीची कुणीही दाखल घेणार नाही. गोलंदाजी करीत असाल तर निव्वळ धाव रोखण्यापेक्षा प्रर्तीस्पर्धी संघाचा डाव संपवण्याचाच प्रयत्न करायला हवा असे प्रतिपादन भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी ड्रीम ११ कप या १४ वर्षाखालील खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना सांगितले. ओव्हल मैदान येथे दिलीप वेंगसरकर फौंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत संजीवनी क्रिकेट अकादमी संघाने अंतिम फेरीत ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघावर सहा विकेटने मात करीत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. नाबाद ४४ धाव करून आपल्या संघाच्या यशात सिंहाचा वाटा उचलणारा युवराज माळी हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मुंबईच्या १४ वर्षाखालील क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष अशोक इस्वलकर, मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी वकील दीपक ठाकरे आणि वेंगसरकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाला निर्धारित २० ओव्हर्समध्ये ६ बाद ९४ धावांचीच मजल मारता आली. मितेश पवार (३२) याचा अपवाद वगळता त्यांचे अन्य फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. संजीवनीच्या अक्षीत तांबे (१३/२) आणि दर्शन राठोड (१७/२) यांनी टिच्चून गोलंदाजी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना गंधर्व कुवळेकर (२६) आणि युवराज माळी (नाबाद ४४) यांनी ५७ धावांची सलामी देत विजयाच्या दिशेने कूच केली होती. मात्र शौनक वडगावणेकर याने १४/२ बळी मिळवत थोडी सनसनाटी निर्माण केली होती; पण युवराजने एक बाजू लावून धरीत संघाचा विजय निश्चित केला.
संक्षिप्त धावफलक – ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी – २० षटकात ६ बाद ९४ (मितेश पवार ३२ ; अक्षीत तांबे १३/२, दर्शन राठोड १७/२) पराभूत विरुद्ध संजीवनी क्रिकेट अकादमी – १९ ओव्हर्समध्ये ४ बाद ९५ (गंधर्व कुवळेकर २६ , युवराज माळी नाबाद ४४; शौनक वडगावणेकर १४/२).

 226 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.