विजयचा चित्तथरारक विजय

हिमजा पाटीलने निर्णायक क्षणी प्रत्येक चेंडूवर बनवलेल्या दोन धावांमुळे विजय क्रिकेट क्लबने अंतिम षटकातील शेवटच्या चेंडूवर व्हिक्टरी क्रिकेट क्लबचा तीन विकेट्सनी केला पराभव

ठाणे : प्रत्येक चेंडूनंतर निर्माण होणारी दोलायमान स्थिती… त्यात शेवटच्या षटकांमध्ये मानसी बोडके मिळवलेली हॅट्ट्रिक. विजयाचे पारडे काहीसे प्रतिस्पर्धी संघाकडे झुकलेले असताना हिमजा पाटीलने निर्णायक क्षणी प्रत्येक चेंडूवर बनवलेल्या दोन धावांमुळे विजय क्रिकेट क्लबने अंतिम षटकातील शेवटच्या चेंडूवर व्हिक्टरी क्रिकेट क्लबचा तीन विकेट्सनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्टस असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित तिसऱ्या अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय मिळवला.
सेंट्रल मैदानावर रंगलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत व्हिक्टरी क्रिकेट क्लबसमोर १९ षटकात ६ बाद ११७ धावांचे आव्हान उभे केले. संघाला शतकी धावसंख्या उभारून देताना मेहक पोकरने २३ धावा, मिताली म्हात्रेने २२ आणि क्षमा पाटेकरने नाबाद १९ धावा केल्या. कोमल परबने २६ धावांत तीन आणि जाग्रवी पवारने एक विकेट मिळवली.
या आव्हानाचा पाठलाग करताना सुरवातीला मिळालेल्या पहिल्या झटक्यानंतर कर्णधार रिया चौधरी आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या जान्हवी काटेने दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी करत संघाला विजयाची आस दाखवली. त्यानंतर विजय क्रिकेट क्लबची हळूहळू यशाकडे वाटचाल सुरु असताना मानसी बोडकेने हॅट्ट्रिक साधत सामन्यात उत्कंठता निर्माण केली. त्यात प्रज्ञा भगतने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत विजय क्रिकेट क्लबच्या फलंदाजांवरचा दबाव वाढवला. अशा परिस्थितीत हिमजा पाटीलने आवश्यकता असताना दोन दोन धावा घेत अंतिम चेंडूवर विजयावर शिक्कामोर्तब केले. निर्धारित ८५ मिनिटांमध्ये १९ षटके पूर्ण झाल्यामुळे सामना तेवढ्याच षटकांचा खेळवण्यात आला. रिया चौधरीने ४३, जान्हवी काटेने ३७ आणि हिमजा पाटीलने नाबाद १० चेंडूत १५ धावा केल्या. सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार रिया चौधरीला घोषित करण्यात आला होता पण मोक्याच्या क्षणी संघाला यश मिळवून देण्यात हिमजानेही मोलाची कामगिरी बजावली असल्याने आपण तिच्यासोबत हा पुरस्कार घेणार असल्याचे रियाने सांगितल्यावर तिला आणि हिमजा पाटीलला संयुक्तरित्या पुरस्कार देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक : व्हिक्टरी क्रिकेट क्लब : १९ षटकात ६ बाद ११७ ( मेहक पोकर २३, मिताली म्हात्रे २२, क्षमा पाटेकर नाबाद १९, कोमल परब ४-२६-३, जाग्रवी पवार ४-२२-१) पराभुत विरुद्ध विजय क्रिकेट क्लब : १९ षटकात ७ बाद ११८( रिया चौधरी ४३, जान्हवी काटे ३७, हिमजा पाटील नाबाद १५, मानसी बोडके ३-१४-३ हॅट्ट्रिक, प्रज्ञा भगत ४-२०-३) सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू : रिया चौधरी, हिमजा पाटील.

 15,757 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.