क्रिकेटचे नियम आत्मसात करा – दिलीप वेंगसरकर

एजिस फेडरल इन्शुरन्स कप या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत जी.पी.सी.सी. संघाने ड्रीम इलेव्हन वेंगसरकर क्रिकेट अकादमीवर ५१ धावांनी विजय मिळवत विजेतेपद पटकवले.

मुंबई : भविष्यात उच्च श्रेणीच क्रिकेट खेळायचं असेल तर आतापासूनच क्रिकेटचे सारे नियम आत्मसात करा असा सल्ला भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी एजिस फेडरल इन्शुरन्स कप या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना दिला. माहुल, चेंबूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत जी.पी.सी.सी. संघाने ड्रीम इलेव्हन वेंगसरकर क्रिकेट अकादमीवर ५१ धावांनी विजय मिळवत या स्पर्धेचे विजेतेपद पटकवले. क्रिकेट नियमांविषयी बोलताना वेंगसरकर यांनी भारत – पाकिस्तान यांच्यातील विश्व चषक क्रिकेट सामन्यातील उदाहरण दिले. फ्री हिट वर खेळताना चेंडू यष्टीला लागून गेल्यानंतर विराट कोहलीने तीन धाव पळून काढल्या त्यावेळी पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांना खेळाचे नियमच माहिती नसल्याचे जाणवले. नियम व्यवस्थित माहिती असल्याने विराट कोहलीने त्यावेळी काढलेल्या तीन धावा कशा निर्णायक ठरल्या हे वेंगसरकर यांनी छोट्या खेळाडूंना विशद केले. पारितोषिक वितरण समारंभास महानगर पालिकेच्या उद्यान विभागाचे सुपरिटेंडेंट जितेंद्र परदेशी, एजिस फेडरलचे डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट दीपेन मारू, एजिस फेडरल क्रिकेट संघाचे कर्णधार अरविंद शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या जी..पी.सी.सी. संघाने लक्ष्मण विश्वकर्मा (८१) आणि वेदांग मिश्रा (४५) यांच्या १३० धावांच्या दमदार सलामी मुळे निर्धारित २० ओव्हर्समध्ये ४ बाद १७१ धावांचे लक्ष्य उभारले. या आव्हानाचा पाठलाग करताना सत्यनारायण घुगे (४५) आणि दर्शन राठोड (२७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी करून अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र घुगे विनाकारण धावचीत झाला आणि नंतरच्या चेंडूवर राठोड त्रिफळाचित झाल्याने अखेर त्यांचा डाव ९ बाद १२० धावांवरच सीमित झाला. श्रीयुष चव्हाण याने केवळ ३२ धावांतच ५ बळी मिळवत सामनावीराचा किताब पटकावला. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून लक्ष्मण विश्वकर्मा याला गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून वेदांग मिश्रा, सर्वोत्तम गोलंदाज म्हणून अथर्व कालेल, तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून दर्शन राठोड यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेत एकूण १२ संघांचा सहभाग लाभला होता. या १२ संघांची चार गटात विभागणी करून प्रथम साखळी आणि नंतर उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने झाले.

संक्षिप्त धावफलक – जी..पी.सी.सी. – २० ओव्हर्समध्ये ४ बाद १७१ ( वेदांग मिश्रा ४५, लक्ष्मण विश्वकर्मा ८१) विजयी विरुद्ध ड्रीम इलेव्हन वेंगसरकर क्रिकेट अकादमी – २० ओव्हर्समध्ये ९ बाद १२० ( सत्यनारायण घुगे ४५, दर्शन राठोड २७ ; श्रीयुष चव्हाण ३२/५). सामनावीर – श्रीयुष चव्हाण.

 290 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.