४८वी कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा- उत्तराखंड – २०२२.
उत्तराखंड : महाराष्ट्राच्या मुलांनी “४८व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. आता उपांत्यपूर्व फेरीत गाठ बलाढय हरियाणा संघाशी होईल. उत्तराखंड राज्य कबड्डी संघटनेच्या विद्यमाने पंतदीप क्रीडांगण, ऋषिकेश, हरिद्वार येथे मॅटवर सुरू असलेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकला ५५-२५ अशी धूळ चारत आगेकूच केली. प्रथम सत्रात प्रतिस्पर्धी संघाचा अंदाज घेत खेळ करणाऱ्या महाराष्ट्राने २३-१३ अशी आश्वासक आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रात खेळ थोडा गतिमान करीत ३०गुणांच्या मोठ्या फरकाने आपला विजय साकारला. महाराष्ट्राच्या या विजयात संघनायक दादासो पुजारी यांने ७, वैभव वाघमोडे याने ५, तर वैभव कांबळेने ४ यशस्वी पकडी करीत या विजयात मोलाची भूमिका वटविली. त्याच बरोबर शिवम पठारे याने चढाईत ८, प्रतीक जाधवने ६, रजतकुमार सिंगने ५ गुण मिळवीत त्यांना उत्तम साथ दिली. पूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राचा बचाव भक्कम झाला आहे. या अगोदर झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने राजस्थानचा सरळ पराभव करीत ग गटात अपराजित रहात बाद फेरी गाठली होती.
बाद फेरी गाठणाऱ्या इतर संघाचा निकाल संक्षिप्त :- १)साई विजयी विरुद्ध पंजाब – ६३-१७; २)मध्य प्रदेश विजयी विरुद्ध झारखंड – ४७-३०; ३) हरियाणा विजयी विरुद्ध हिमाचल प्रदेश – ३०-२३; ४) राजस्थान विजयी विरुद्ध उत्तर प्रदेश – ४३-१५; ५) बिहार विजयी विरुद्ध गोवा – ४०-२७; ६) दिल्ली विजयी विरुद्ध पश्चिम बंगाल – ४९-४२; ७)चंदीगड विजयी विरुद्ध तामिळनाडू ३८-३०.
362 total views, 2 views today