स्पोर्ट्सफिल्ड आणि मुंबई पोलीस जिमखाना अशी अंतिम लढत

अजित घोष स्मृती महिला टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा

मुंबई : बलाढय़ स्पोर्ट्सफिल्ड आणि मुंबई पोलीस जिमखाना यांच्यामध्ये अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत उद्या शुक्रवारी शिवाजी पार्क जिमखान्यावर संपन्न होईल. एकीकडे पोलीस जिमखान्याने विजय क्रिकेट क्लबवर अक्षरशः शेवटच्या चेंडूवर विजय मिळविला तर स्पोर्ट्सफिल्डने पय्याडे स्पोर्ट्स क्लबवर १८ धावांनी मात केली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या विजय क्लबने रिया चौधरी (३९) आणि जान्हवी काटे (२४) यांच्या सलामीच्या ५१ धावांच्या भागीदारीनंतर मात्र अपेक्षित प्रगती केली नाही. भरवशाची जाग्ररी पवार बाद झाल्यावर त्यांच्या विकेट फारशी भर न घालता पडत गेल्या. मात्र १९ षटकांत ९ बाद ११४ या धावसंख्येचा बचाव मात्र त्यांनी नेटाने केला.
मुंबई पोलीस जिमखान्याची १६.४ षटके झाली असता ७ बाद १०६ अशी स्थिती होती. विजयासाठी हव्या असणाऱ्या ९ धावा करताना त्यांची दमछाक झाली. सृष्टी कुडाळकर आणि निधी बुळे या जोडीने त्यांची नैया पार केली. सृष्टी नाईक (२७) आणि तन्वी परब (३८) या दोघींचे योगदान पोलीस संघासाठी महत्त्वाचे ठरले.
विजेतेपदाचे दावेदार असणाऱ्या स्पोर्ट्सफिल्डची ५ बाद २६ अशी मोठी केविलवाणी स्थिती झाली होती. नैनिका गोहिलने त्यांना दोन धक्के दिले आणि त्यांचे तीन बॅटर रनआऊट झाले. त्यातून श्वेता कलापती (२७), प्रकाशिका नाईक (२१) आणि मनाली दक्षिणी (१५) यांनी त्यांची सुटका केली१६ षटकांत 8 बाद १०७ ही तशी चांगली स्थिती त्यामुळे बनली. पय्याडेची २ बाद ५२ वरून घसरगुंडी झाली. ऑफस्पिनर समृद्धी राऊळने १० धावांत ५ बळी घेत विजयाची वाट मोकळी केली.
विजय क्रिकेट क्लब : ११ षटकांत ९ बाद ११४ (रिया चौधरी ३९, जान्हवी काटे २४, शेरिल रोझारिओ १७/२, क्षमा पाटेकर १७/२) पराभूत विरुद्ध मुंबई पोलीस जिमखाना ः १९ षटकांत ७ बाद ११५ (सृष्टी नाईक २७, तन्वी परब ३८, कोमल परब १७/२, बतुल परेरा २०/२) सामन्यात सर्वोत्तम ः तन्वी परब.
स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लब ः १६ षटकांत ८ बाद १०७ (श्वेता कलापती २७, मनाली दक्षिणी १५, प्रकाशिका नाईक २१, नैनिका गोहिल १३/२) विजयी विरुद्ध पय्याडे स्पोर्ट्स क्लब १५.३ षटकांत ८९ (साईमा ठाकोर ३८, तनिषा गायकवाड १६, समृद्धी राऊळ १०/५, फातिमा जाफर १२/२) सामन्यात सर्वोत्तम ः समृद्धी राऊळ.

 154 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.