यजमान स्पोर्टिंग युनियनचा सहज विजय

अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट – मुंबई पोलीस जिमखाना तीन धावांनी विजयी

मुंबई : यजमान स्पोर्टिंग युनियन आणि मुंबई पोलीस जिमखाना या संघांनी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये आज दणदणीत विजय नोंदविले. एकीकडे पोलीस जिमखान्याने ठाणे स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाचा अवघ्या तीन धावांनी पराभव केला तर स्पोर्टिंग युनियनने प्रतिस्पर्धी दहिसर स्पोर्टस् क्लबवर ७ विकेटने मात करताना आपल्या समोरील ८६ धावांचे लक्ष्य अवघ्या १०.३ षटकांत पार केले. तसेच आज झालेल्या दोन अन्य लढतीत स्पोर्टस् फिल्ड क्रिकेट क्लबने विजय क्रिकेट क्लबला ८ विकेटसनी हरविले. या सामन्यात हिंदुस्थानची सलामीची बॅटर पूनम राऊतने (नाबाद ४१) दमदार खेळ केला. दुसऱ्या सामन्यात बलाढ्य पय्याडे स्पोर्टस् ने ग्लोरियस क्रिकेटवर १३ धावांनी मात करून दोन गुण खिशात घातले.
स्पोर्टिंग युनियन आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्टस् फाऊंडेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत आठ संघांचा सहभाग असून साखळी आणि बाद तत्त्वावर ती खेळविली जाणार आहे. आज सकाळी हिंदुस्थानच्या माजी खेळाडू सुलक्षणा नाईक यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. त्यासमयी हिंदुस्थानच्या माजी खेळाडू अरुंधती घोष या स्पर्धेच्या आयोजिका उपस्थित होत्या.
स्पोर्टिंग युनियनच्या विजयामध्ये सिद्धेश्वरी पागधरेने मुख्य भूमिका निभावताना ३३ चेंडूंत नाबाद ४९ धावांची खेळी केली. त्यात ७ चौकार होते. त्याआधी मानसी पाटील हिने आपल्या लेगस्पिनवर १३ धावांत ३ बळी घेतले. मानसीने मग सलामीला येत २३ धावा केल्या आणि सिद्धेश्वरीसह ४५ धावांची भागी रचत विजयाचा पाया रचला.
पोलीस जिमखान्याकडून सृष्टी नाईक (३०), शेरील रोझारिओ (२८) आणि निधी बुळे (३०) यांनी लक्षणीय योगदान दिल्याने त्यांच्या संघाला ७ बाद १३५ अशी मजल मारता आली. प्रत्युत्तरादाखल ठाणे संघ ९ बाद १३२ धावा करू शकला. त्यांच्या निव्या आंब्रे हिने ६५ धावांची झुंजार व एकाकी खेळी केली, जी वाया गेली. संघाची १२४ धावसंख्या असताना निव्या बाद झाली तरी तिच्या संघापाशी चार विकेट हाती शिल्लक होत्या.

 158 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.