पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा. पुणे व ठाणे उपविजेते सुयश गरगटे राजे संभाजी तर रेश्मा राठोड अहिल्या पुरस्काराची मानकरी
हिंगोली : ५८ वी पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद व निवडचाचणी खो-खो स्पर्धेत गतविजेत्या पुण्याला पराभवाची धूळ चारत मुंबई उपनगरने अतिशय चुरशीच्या सामन्यात पुरूषांचे अजिंक्यपद मिळवले. महिलांचा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला. महिलांमध्ये गतविजेत्या पुण्याने पुन्हा एकदा ठाण्याचा शेवटच्या क्षणाला पराभव केला व गतवर्षीची विजयी परंपरा कायम राखली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने हिंगोली जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली तालुका खो-खो असोसिएशन आयोजित राज्यअजिंक्यपद स्पर्धा रामलिला मैदानात पार पडली.
शेवटच्या दिवसाच्या सत्रातील अंतिम सामने रंगतदार झाले. महिलांच्या अंतिम सामन्यात पुण्याने ठाण्यावर १२-११ असा १ गुणाने मात केली. मध्यंतराला पुण्याने घेतलेली ६-५ आघाडीच निर्णायक ठरली. पुण्याच्या प्रियांका इंगळे (१:५०, २:२० मि. संरक्षण व २ गुण), काजल भोर (२:१०, १:५० मि. संरक्षण व १ गुण), स्नेहल जाधव (१:४०, १:३० मि. संरक्षण व १ गुण) यांच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर पुण्याने विजयी भरारी घेतली. ठाण्यातर्फे रेश्मा राठोड (२:४०, २:४० मि. संरक्षण व ३ गुण), पौर्णिमा सकपाळ (१:१०, २ मि. संरक्षण व २ गुण), अश्विनी मोरे (१, १:२० मि. संरक्षण) यांनी चांनी जोरदार लढत दिलीऊ मात्र त्या आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने गतविजेत्या पुण्याला पराभवाची धूळ चारत गेल्या वर्षाच्या पराभवाचा बदला घेतला. पुरुषांचा अंतिम सामना सुध्दा चुरशीचा झाला. उपनगरने पुण्याविरुध्द १९-१८ (मध्यंतर १०-१०) अशी एक गुणाने विजयश्री खेचून आणली. उपनगरच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला निहार दुबळेने दुसर्या डावात १:४० मि. संरक्षण करत विजयावर शिक्कामोर्तब केले. उपनगरच्या ॠषिकेश मुर्चावडे (१:४०, १:४० मि. संरक्षण व ३ गुण), अक्षय भांगरे (१:२०, १:१० मि. संरक्षण), अनिकेत चेंदवणकर (१:१०, मि. संरक्षण), हर्षद हातणकर (१:१०, २:१० मि. संरक्षण व १ गुण) , अनिकेत पोटे (६ गुण) यांनी जोरदार खेळाचे प्रदर्शन करत विजयात मोलाची भुमिका बजावली. तर पुण्यातर्फे सुयश गरगटे (१:४०, १ मि. संरक्षण, ३ गुण), ॠषभ वाघ (१:३०, १:४० मि. संरक्षण व १ गुण), प्रतिक वाईकर (१:२०, १:१० मि. संरक्षण व १ गुण) संकेत सुपेकर (५ गुण) यांनी विजयासाठी निकराची लढत दिली पण त्यांना विजयाने धोबीपछाड दिली.
सर्वोत्कष्ट खेळाडू : पुरुष : अष्टपैलू आणि राजे संभाजी पुरस्कार: सुयश गरगटे (पुणे) संरक्षक: निहार दुबळे (मुंबई उपनगर), आक्रमक: अनिकेत पोटे (मुंबई उपनगर).
महिला: अष्टपैलू आणि राणी अहिल्या पुरस्कार : रेश्मा राठोड (ठाणे), संरक्षक: काजल भोर (पुणे), आक्रमक : प्रियंका इंगळे (ठाणे).
338 total views, 1 views today