शिर्डीत होणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अभ्यास शिबिर

राष्ट्रवादी मंथनः वेध भविष्याचा अंतर्गत होणाऱ्या अभ्यास शिबिरात राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यासह कृषी, विज्ञान, अर्थ, संरक्षण, पत्रकारिता आदी  क्षेत्रातील मान्यवर करणार मार्गदर्शन

ठाणे :  महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी “राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा” या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यासह कृषी, विज्ञान, अर्थ, संरक्षण, पत्रकारिता आदी  क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री डाॅ.जितेंद्रआव्हाड यांनी दिली.
आजवरच्या २३ वर्षाच्या प्रवासातील साडेसतरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या सत्तेमध्ये राहिला. शरद पवार यांनी  सातत्याने केलेली विचारांची पेरणी आणि दुस-या फळीतील नेत्यांनी केलेली मशागत यामुळे प्रत्येक आघाडीवर पक्षाने अग्रभागी राहून आपली भूमिका बजावली. समविचारी पक्षांना सोबत घेऊन वैचारिक लढाई लढली. हीच परंपरा अधिक व्यापक आणि गतिमान करण्यासाठी शिर्डी येथे “”राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा’” या अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांना दहशतीखाली ठेवण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने अडीच वर्षे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न झाले. केंद्रीय यंत्रणांची दहशत वापरुनच फोडाफोडी करून महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यात आले. केंद्रातील सत्ताधार्‍यांच्या कारभारामुळे देशापुढे अनेक प्रश्न गंभीर स्वरुपात उभे राहिले आहेत. वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदणार्‍या या देशातील काही समाजघटकांना सतत भीतीच्या छायेखाली ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. समाजामध्ये फूट पाडण्याचे तसेच विद्वेष निर्माण करण्याचे काम सत्तेच्या माध्यमातून केले जात आहे. घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण करण्याची मोहीम राबवली जात आहे. लोकशाही पद्धतीने आवाज उठवणार्‍या विद्यार्थ्यापासून अभ्यासकांपर्यंतच्या विविध घटकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी सुरु आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पगारी ट्रोल्सच्या टोळ्यापासून पत्रकारांपासून कलावंतांपर्यंत विविध घटकांचा छळवाद मांडला जात आहे. आर्थिक आघाडीवर प्रचंड अपयश आले असून त्यापासून समाजाचे लक्ष भलतीकडे वळवण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवण्यात येत आहेत. २०१४ पूर्वी रुपयाच्या घसरणीचा ठपका तत्कालीन पंतप्रधानांवर ठेवणारे लोक आता रुपयाच्या अभूतपूर्व घसरणीचेही लंगडे समर्थन करु लागले आहेत. बेरोजगारीच्या संकटाने अक्राळविक्राळ स्वरुप धारण केले असून त्याबाबत कुठल्याही टप्प्यावर गांभीर्य दिसत नाही. महागाई आकाशाला भिडली असून त्यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. शिक्षणापासून सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत इतिहासाचे विकृतीकरण खरून खोटा इतिहास थोपवण्याचे प्रयत्न सत्तेच्या माध्यमातून सुरु आहे. अनेक पातळ्यांवरचे अपयश लपवण्यासाठी धार्मिक मुद्यांच्या आड लपण्याचा प्रयत्न केला जात आहे.
देशासमोर, राज्यासमोर अनेक प्रश्न असताना व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करुन लोकांना संभमित करण्याचे प्रयत्न सत्ताधा-यांकडून केले जातात. या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांसंदर्भातील नेमके वास्तव काय आहे, त्यासंदर्भातील नेमकी आव्हाने कोणती आहेत आणि त्यांना सामोरे कसे जाता येईल यासंदर्भातील मंथन शिबिरामध्ये करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा’ या शिबिरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते  अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यातील विविध क्षेत्रातील विचारवंत, अभ्यासक,कृषी, विज्ञान, अर्थ, संरक्षण, पत्रकार आदी महनिय व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत

 52,073 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.