हा तर महाराष्ट्राच्या अस्मिता, स्वाभिमान आणि प्रगतीवर फेकलेला दगड


डॉ. जितेंद्र आव्हाड यांची राज्यसरकारवर टीकेची झोड

ठाणे : ज्या महाराष्ट्राने कोणालाही उपाशी झोपू दिले नाही. त्या महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगारीमुळे आता उपाशी झोपावे लागत आहे. राज्यातील उद्योग परराज्यात जात आहेत. त्यावर महाराष्ट्राच्या वेदना तीव्र आहेत.एवढे मोठे प्रकल्प जर महाराष्ट्राच्या घशातून ओढले जात असतील तर महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि प्रगतीवर फेकलेला दगड आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली.
फॉक्सकॉन नंतर आता एअर बस प्रकल्प गुजरातला गेला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, डॉ. आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली. 
डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की,  एअर बसबाबत आपण अनेक वर्ष ऐकत होतो. हा प्रकल्प महाराष्ट्रातच येणार होता. त्यासाठी जागेची निश्चिती करण्यात आली होती. पण, हा प्रकल्प महाराष्ट्रात ‘लँड’ होत असताना अचानक महाराष्ट्रातील कोणते हवामान खराब झाले की ते अचानक गुजरातमध्ये लँड झाले, हे कळायला मार्ग नाही. पण, महाराष्ट्राचे होणारे नुकसान; महाराष्ट्रातील तरुणांना मिळणारी नोकरीची संधी दिवसेंदिवस हिरावून घेतली जात आहे. एक काळ असा होता की, देशातील कोणात्याही भागातील तरुणाने महाराष्ट्रात यायचे आणि २४ तासात त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था ही महाराष्ट्राची माती करायची! या मातीचा गुणधर्मच होता की भारतातील कोणत्याही माणसाला महाराष्ट्राने उपाशी झोपू दिले नाही. आता मात्र या मातीतच जन्माला आलेल्या तरुणाईला उपाशी झोपावे लागत आहे. दिवसेंदिवस बेरोजगारीचा जो आलेख चढताच आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच इतही बेरोजगारी महाराष्ट्रात दिसत आहे. ही बाब नक्कीच चांगली नाही. उपाशीपोटी झोपणारी मुले आणि त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात. राज्यकर्ते जर येथून जाणारे प्रकल्प-उद्योग थांबवू शकत नसतील तर त्यांचे ते मोठे अपयश आहे. इंग्लडमध्ये फक्त महागाई झाली म्हणून अवघ्या ४५ दिवसात पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. एवढी संवेदनशीलता अपेक्षित नाही. पण, फॉक्सकॉन गेल्यानंतर आम्हाला मोठा प्रकल्प देण्यात येईल, असे आश्वासीत करण्यात आले होते. लहान मुलाला जसे चॉकलेटचे आमीष दाखविले जाते; तसेच आमीष फॉक्सकॉनच्या वेळी दाखविले होते. त्यावर आता काय उत्तर देणार? मात्र महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या वेदना तीव्र आहेत. एवढे मोठे प्रकल्प जर महाराष्ट्राच्या घशातून ओढले जात असतील तर महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि प्रगतीवर फेकलेला दगड आहे.
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडून हे प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत का, असे विचारले असता,  निवडणुका होतात, त्याचा या विषयाशी काही सबंध आहे, असे आपणाला वाटत नाही. पण, आपलय घरातून एखादा माणूस एखादी वस्तू घेऊन जातो. ही वस्तू घरातच राहिल, ही जबाबदारी कोणाची? महाराष्ट्राच्या घराची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे; त्यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. ऐद्योगिक प्रगतीमध्ये १९५० नंतर किंवा त्याच्या आधीही उद्योग स्थापन व्हायला सुरुवात झाली. औद्योगिकीकरणात महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकावर राहिले होते. आता अधोगतीला सुरुवात झाली आहे. एकेकाळी परराज्यातील मुलांना महाराष्ट्रात नोकरी मिळायची. आता अशी वेळ आली आहे की आपल्या राज्यातील मुलांना नोकरीसाठी परराज्याची वाट धरावी लागणार आहे, यापेक्षा मोठे दुर्देवं नाही, असे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याने सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते महाविकास आघाडीवरच कापर फोडत आहेत, याबाबत विचारले असता, डॉ. आव्हाड यांनी,  महाविकास आघाडीवर खापर फोडले जात असले तरी महाराष्ट्रातील जनता दुधखुळी नाही. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन आता चार महिने होत आहेत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार जर महाविकास आघाडीच्या चुका झाल्या असतील तर चार महिने तुम्ही काय झोपले होते का? आज तुमची दिल्लीमध्ये चलती आहे. त्यामुळे तुम्ही एअरबसच काय रॉकेट लाँचरचा प्रकल्प महाराष्ट्रात आणायला हवा होता, असे सांगितले.
घसरणार्‍या रुपयाच्या दरावर बोला
देशाची दिशा कशी बदलायची, यामध्ये काहीजण माहिर आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात आपण किती धर्माचे आचरण करीत आहोत, हे दाखविण्यासाठी केजरीवाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांना माहित होते की यावरुन देशात वादळ उभे राहणार आहे. लोकांच्या पुढे प्रश्न महागाईचा आहे’ लोकांच्या पुढे बेरोजगारीचा आहे; महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाचा प्रश्न आहे. परतीच्या पावसाने राज्यात थैमान घातले आहे. शेतकरी जीवंत राहिल का, अशी चिंता वाटत आहे. असे अनेक प्रश्न असताना आपण कशावर चर्चा करतोय? एका धर्मनिरपेक्ष देशात काय असले पाहिजे, हे मी वेगळे सांगायला हवे का? पण, नसलेल्या विषयाचा ‘विषय’ निर्माण करुन लोकांना दुसर्‍या मार्गावर घेऊन जाण्याचे काम काही राजकीय मंडळी यश्वीरित्या करीत आहेत आणि आपणही त्यामध्ये सहभागी होतो, हे दुर्देवी आहे. आपले चलनच इतके खाली घसरत चालेलंय; त्यावर आपण बोललं पाहिजे. रुपयाची घसरत चाललेली किमंत आणि डॉलरची वाढत चाललेली किमंत ही देशाच्या दृष्टीने धोक्याचे आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. फोटो कुणाचा असावा, याच्यावर भाष्य करणे हास्यास्पद आहे.
कळवा आणि भारतगिअरच्या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी करावे
कळवा पुलाच्या उद्घाटनाबाबत विचारले असता, ‘आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे की, लवकरात लवकर शिल्लक काम पूर्ण करुन पुलाचे उद्घाटन करा. मुंब्रा-कौसा येथील भारत गिअरच्या उड्डाणपुलाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. त्याचेही उद्घाटन करुन घ्यावे. मुख्यमंत्र्यांचा सन्मान रहावा, अशी अपेक्षा आहे. हे दोन्ही पूल आपल्या मतदारसंघातील असून ते आपणच मंजूर करुन आणले आहेत. ही गोष्ट खरी आहे की, कळवा खाडीवरील तिसर्‍या पुलाला ठामपाने त्यास मदत केली; ठामपानेच निधी दिला आहे. भारत गिअर येथील पुलाचे काम एमएमआरडीएकडून झाले आहे; या सर्व गोष्टी बाजूला ठेवू या.पण, लोकांचे जे हाल होत आहेत ते तर संपवा. ते मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. त्यानंतर उगाच बोंबाबोंब करायची की जितेंद्र आव्हाडांनी आगाऊपणा केला आणि पुल खुला केला. आपणाला तसे करायचे नाही. आपण मोठ्या मनाने सांगत आहोत की पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी फक्त आपली गाडी पुलावरुन फिरवावी. कारण, लोकांना भाषणे ऐकण्याची फारकाही हौस असते अशातला भाग नाही. लाल फित लावलेली असेल ती कापा; फोटो काढा; आपल्या नावाची पाटी लावा; तो पूल कोणी करुन घेतला, याच्या मागे कोण आहे, हे लोकांना माहित आहे त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे ती थांबवा; आपण जर पूर्वीप्रमाणे वागलो असतो तर आतापर्यंत पुलाचे उद्घाटन झाले असते. पण, मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत; त्यांचा सन्मान झालाच पाहिजे, या मताचा मी आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर दोन्ही पुलांचे उद्घाटन करावे,असे आवाहनही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.

 123,256 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.