जागतिक मोटरस्पोर्टस स्पर्धेसाठी संजय भारतीय संघात

प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमान

मुंबई : माजी आशिया-पॅसिफीक रॅली विजेता संजय टकले दुसऱ्या जागतिक मोटरस्पोर्टस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करेल. फ्रान्समधील मार्से येथील पोल रिका सर्कीटवर २६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होईल.
संजयच्या नावाची शिफारस एफएमएससीआय (फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्टस क्लब्ज ऑफ इंडिया) या भारतातील अधिकृत राष्ट्रीय शिखर संघटनेने एफआयए (फेडरेशन इंटरनॅशनली डी ऑटोमोबील) या जागतिक संघटनेकडे केली. करोनामुळे गेली दोन वर्षे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती.
पोल रिका सर्कीटवर अनेक वर्षांपासून फ्रेंच ग्रांप्री फॉर्म्युला वन शर्यतीचे आयोजन केले जाते. ल कॅस्टेलेट या गावात १९६९ मध्ये हे सर्कीट बांधण्यात आले आहे. फ्रान्सला रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत संजयने सांगितले की, जागतिक स्पर्धेत मी देशाचे प्रथमच प्रतिनिधीत्व करणार आहे. त्यामुळे ही संधी अत्यंत खास आहे. या महोत्सवात प्रत्येक स्पर्धाक आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करतो. त्याला राष्ट्रध्वजासाठी कौशल्य आणि क्षमता पणास लावण्याची संधी मिळते. माझ्या आजवरच्या कारकिर्दीतील हा अभिमानस्पद क्षण असेल. त्यामुळे फ्रान्समध्ये भारताचे, तिरंग्याचे प्रतिनिधीत्व करण्यास मी आतूर आहे.
पुणेस्थित संजयने यापूर्वी आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेत (एपीआरसी) भाग घेतला आहे. मोटरस्पोर्टसमध्ये बहुतांश प्रकारांमध्ये स्पर्धक संघाचे प्रतिनिधीत्व करतो अथवा वैयक्तिक स्वरुपात भाग घेतो. त्यामुळे देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दुर्मिळ मानली जाते.
संजयला मुंबईस्थित एअरपेस या कंपनीचे पाठबळ लाभले आहे. ड्रोनवर आधारित पायाभूत वाहतुक यंत्रणा क्षेत्रातील ही कंपनी आहे, जी २०१९ मध्ये युवा उद्योजकांनी स्थापन केली. ही कंपनी एका स्वप्नवत प्रकल्पावर काम करीत आहे. शहरांतर्गत वाहतुक ड्रोन तंत्रज्ञानाने अधिक स्मार्ट आणि शाश्वत पद्धतीने करण्यासाठी जगाला प्रेरीत करण्याची त्यांची ध्येयदृष्टी आहे.
एफएमएससीआयने आधीच्या कामगिरीवर संजयचे नाव मंजुर केले. रॅलीमध्ये पुनरागमनासाठी संजय प्रयत्नशील आहे. सहभाग निश्चित झाल्यानंतर संजयला नॅव्हीगेटरची निवड करणे आवश्यक होते. या स्पर्धेच्या नियमानुसार ड्रायव्हरला दुसऱ्या देशाच्याही नॅव्हीगेटरची निवड करता येते. संघ मात्र ड्रायव्हर ज्या देशाचा आहे त्याच देशाचा मानला जातो. संजयने न्यूझीलंडच्या माईक यंग याची निवड केली. संजयने एपीआरसी तसेच क्रॉस कंट्री रॅलीसाठी भारताचा मुसा शरीफ आणि मलेशियाचा शॉन ग्रेगरी यांच्या साथीत भाग घेतला आहे. यावेळी त्याने ऑस्ट्रेलिया-स्थित यंगची निवड केली. याविषयी संजयने सांगितले की, नॅव्हीगेटर म्हणून कुणाची निवड करावी याबद्दल मी थोडा विचार केला. याचे कारण यंगने विविध आंतरराष्ट्रीय सर्कीटवर रेसिंग केले आहे. तो स्वतः कुशल रॅली ड्रायव्हर आहे.
संजय व यंग यांनी २०१९ मध्ये टॅलीन येथील इस्टोनिया रॅलीत भाग घेतला होता. त्यावेळी यंग नॅव्हीगेटर होता. एपीआरसी मालिकेत जपानच्या कुस्को मोटरस्पोर्ट संघात यंग त्याचा सहकारी होता.
संजय फ्रेंच बनावटीची प्युजो कार चालवेल. तो रॅली४ गटात सहभागी होईल. संजय-यंग यांना आठ टप्प्यांत सुमारे दिडशे किलोमीटर अंतर पार करावे लागेल. मार्गाचा तपशील त्यांना स्पर्धेच्यावेळीच मिळेल. या स्पर्धेत १२ वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश आहे. यात ऑटो स्लालोम, फॉर्म्युला ४, जीटी, जीटी स्प्रींट, कार्टिंग, एन्ड्यूरन्स, कार्लीट स्लालोम, रॅली २, रॅली ४, टुरींग कार आदींचा समावेश आहे.

 304 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.