दिवाळी दरम्यान भातसातून ठाण्याला मिळणार जादा पाणी – आ. केळकर.
ठाणे : घोडबंदरसह ठाण्यातील अन्य भागात सुरू असलेल्या पाणी टंचाईबाबत आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येत आहे. त्यांच्या सूचनेनुसार पाणी पुरवठा विभागाने इमारतनिहाय तपासणी सुरू केली असून आवश्यक तेथे दुरुस्त्या, नवीन जोडण्या देण्यात येत असल्याने संकुलांची तहान भागू लागली आहे.
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आमदार संजय केळकर यांनी घोडबंदर भागातील संकुले आणि शहरातील अन्य भागांतील पाणी टंचाईबाबत महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत उपायुक्त गोदेपूरे, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, कार्यकारी अभियंता विनोद पवार, अतुल कुलकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते तर पाणी टंचाईग्रस्त भागातील आणि गृह संकुलांतील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी इमारतनिहाय तपासणी करून त्यावर उपाय योजना सुरू करण्याचे ठरले.
गेल्या दीड महिन्यात पाणीपुरवठा विभागाकडून वस्ती आणि इमारतनिहाय तपासणी सुरू करण्यात आली. आवश्यक तेथे दुरुस्त्या आणि नवीन वाढीव जोडण्या देण्याबरोबरच पाण्याचा दाब वाढवून पाणी वाटपात समानता आणण्याचे प्रयत्न करण्यात आले.
धर्मवीर नगरसारख्या मोठ्या वसाहतीला १० इंच व्यासाची नवीन जलवाहिनी देण्यात आल्याने येथील पाणी टंचाई दूर झाली आहे. पूजा गॅलेक्सी, कॉसमॉस, निळकंठ ग्रीन, मरी आई नगर-कोलशेत, मनोरमा नगर, रचना संकुल अशी अनेक गृहसंकुले आणि वसाहतींमध्ये नवीन जोडण्या देण्यात आल्या, काही ठिकाणी पाण्याचा दाब वाढवण्यात आला, तर काही ठिकाणी पाणी वाटपात समानता आणून पाणी टंचाई दूर करण्यात आली. या गृहासंकुलांमध्ये आणि वसाहतींमध्ये हजारो नागरिक वास्तव्यास असून पुरेसा पाणी पुरवठा होऊ लागल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या बाबतच्या आभारपत्रांचा खच आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयात वाढू लागला आहे.
शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी आम्ही अनेक आंदोलने केली आहेत. लोक चळवळ उभारून ठाणे शहर टँकरमुक्त करणार आहे. गृहसंकुले आणि वसाहतींच्या तक्रारी मिळाल्यास तेथेही योग्य उपाययोजना करण्यात येतील, असे केळकर यांनी सांगितले.
भातसातून ठाणे शहराला ५० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळावे यासाठी आमदार संजय केळकर प्रयत्नशील असून याबाबतचा करारही झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दिवाळीपूर्वी हे अतिरिक्त पाणी मिळण्यास सुरुवात व्हावी याबाबत त्यांनी पाणी पुरवठा विभागाकडे आग्रह धरला आहे.
22,542 total views, 1 views today