नवरात्रीनिमित्त तृतीयपंथीयाला दिला साडी ओटीचा मान

तृतीयपंथींयांना समाजात असेच स्थान मिळाले तर सामान्यांच्या प्रवाहात यायला वेळ लागणार नाही अशा भावना लकी तुपे यांनी केल्या व्यक्त.

ठाणे : तृतीयपंथींयांना समाजात सर्वसामान्यांप्रमाणे स्थान मिळावे तसेच, त्यांना सर्व सण – उत्सवात सामावून घेता यावे म्हणून भारतीय जनता पार्टी ठाणे शहर (जिल्हा)च्यावतीने साडी ओटीचा मान लकी तुपे या तृतीयपंथीयाला देण्यात आला. विविध क्षेत्रातील स्त्रीयांबरोबर त्यांचीही नवरात्रीनिमित्त साडी ओटीने सन्मान करण्यात आला. तृतीयपंथींयांना समाजात असेच स्थान मिळाले तर सामान्यांच्या प्रवाहात यायला वेळ लागणार नाही अशा भावना लकी यांनी व्यक्त केल्या.
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सारंग मेढेकर यांनी विविध क्षेत्रांतील नऊ महिलांचा नवरात्रोनिमित्त सन्मान केला. या नऊ जणींमध्ये तृतीयपंथी भगिनीचा देखील सहभाग होता. आदिशक्तीची उपासना करण्याचा हा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. खरे तर प्रत्येक स्त्रीमध्ये ही शक्ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असतेच. या स्त्रीयांचा सन्मान अष्टमीच्या निमित्ताने सोमवारी करण्यात आला. पोलीस दलातील स्नेहल मंत्री, वैद्यकीय क्षेत्रातील अनुपमा वट्टमवार, क्रिमिनल वकील ॲड. रिया डेरे, शिक्षिका ज्योती निकम, ॲथलिट दिपाली साठे, रिक्षा चालक सुनिता नवले, बस कंडक्टर स्वप्नाली तांबटकर, सफाई कामगार अश्विनी परदेशी यांची भाजपा सदस्य संजना मेढेकर यांच्या हस्ते साडी देऊन ओटी भरण्यात आली. पहिल्यांदाच अशा पद्धतीने आमचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान आमचा नसून आमच्या क्षेत्राचा आहे असे आम्ही मानतो अशा भावना या महिलांनी व्यक्त केल्या. त्याप्रसंगी भाजपा ठाणे युवती विभागाच्या सहसंयोजिका जागृती विचारे, भाजपा ठाणे युवा मोर्चा सह संपर्कप्रमुख लव मांजरेकर, यामिनी राऊत, मालती भिलारे आदी उपस्थित होते.

 15,181 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.