महाराष्ट्राच्या खोखो संघांनी एकदिवस आधीच लुटले सोने

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खो खो त दबदबा राखताना महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी मिळवले अजिंक्यपद

अहमदाबाद : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघांनी दस-याच्या पू्र्वसंध्येला सुवर्णपदक जिंकून विजयादशमीचे सोने लुटले. दोन्ही गटात निविर्वाद वर्चस्व गाजवत महाराष्ट्राच्या खोखो खेळाडूंनी दुहेरी सुवर्णपदकाची भेट देऊन विजयादशमीचा आनंद द्विगुणित केला.
संस्कारधाम इनडोअर स्टेडियममध्ये मंगळवारी झालेल्या अंतिम लढतीत महिला गटात महाराष्ट्राने ओडिशावर डावाने विजय साकारत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने १८-८ असा एक डाव व १० गुणांनी ओडिशाचा पराभव केला. महाराष्ट्राकडून रुपाली बडेने ३ मि. संरक्षण करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रियांका भोपीने २:५० आणि ३:५० मि. पळतीचा खेळ केला आणि २ गुण मिळवत अष्टपैलू कामगिरी नोंदवली. प्रियांका इंगळेने १:५० मि. संरक्षणाचा उत्कृष्ट खेळ केला. तसेच तिने ८ गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रेश्मा राठोडने २:५० मि. संरक्षण केले. रुपाली बडेने ३ मि. पळतीचा खेळ करुन सर्वांचीच वाहवा मिळवली. अपेक्षा सुतारने १:४० मि. संरक्षण केले व दोन गुण देखील मिळवले. संपदा मोरे हिने १:२० मि. नाबाद संरक्षण केले. ऋतुजा खरे हिने दोन गुण मिळवले. ओडिशाकडून निकिता साहू, शुभाश्री व मागी माझी यांनी अष्टपैलू कामगिरी बजावली.
पुरुष गटात महाराष्ट्राने केरळ विरुद्ध आक्रमक खेळ करत सुवर्णपदक जिंकले. महिला गटाप्रमाणेच महाराष्ट्राचा पुरुष संघ डावाने जिंकतो की काय याची मोठी उत्सुकता होती. मात्र, महाराष्ट्राने केरळचा चुरशीच्या लढतीत सात मि. राखून व ४ गुणांनी (३०-२६) विजय साकारत सुवर्ण पदक पटकावले.
महाराष्ट्राच्या सर्वच खेळाडूंची लक्षवेधक कामगिरी ठरली. अक्षय भांगरेने २ मि. व १:१० मि. संरक्षण केले. रामजी कश्यप याने १:३० मि. व २ मि. पळतीचा सुरेख खेळ केला. ह्रषिकेश मुर्चावडेने अष्टपैलू कामगिरी बजावली. त्याने १:४० व १:३० मि. पळतीचा सुरेख खेळ केला व ६ गुण मिळवून संघाच्या सोनेरी यशात मोलाचा वाचा उचलला. सुरेश गरगटे याने १:२० मि. संरक्षण केले व १४ गुण घेऊन संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. प्रतिका वाईकरने १:२० मि. पळतीचा खेळ केला. लक्ष्मण गवसने ४ गुण मिळवले. केरळकडून निहाल, श्रीजेश व अभिराम यांनी झुंज दिली.

सुवर्ण भेट : शीतल भोर
महाराष्ट्रातील तमाम खोखो आणि क्रीडा प्रेमींना विजयादशमीनिमित्त सुवर्ण पदकाची भेट देता आली यापेक्षा दुसरा आनंद नाही. अंतिम सामन्यात ओडिशा संघाला डावाने हरवून सुवर्ण पदक जिंकू असा विश्वास होताच आणि प्रत्यक्षात सामना डावाने जिंकून आम्ही सुवर्ण जिंकले याचा मोठा आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया महिला खोखो संघाची कर्णधार शीतल भोर हिने व्यक्त केली.
शीतल भोर म्हणाली की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेपूर्वी खोखो संघाचा १५ दिवसांचे सराव शिबिर घेण्यात आले. या सराव शिबिरात अधिक प्रभावी पद्धतीने सराव करुन घेण्यात आला. तसेच आम्हाला अतिशय चांगल्या सुविधा देण्यात आल्या. संघात दर्जेदार व अनुभवी खेळाडू असल्याने आमचा संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार होताच. संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक, पदाधिकारी यांनी आमचे मनोबल वाढवले. या सर्वांचा परिपाक म्हणजेच आम्ही मिळवलेले हे सुवर्णपदक आहे, असे शीतल भोर हिने सांगितले.

सुवर्ण जिंकण्याचेच ध्येय होते : ह्रषिकेश मुर्चावडे
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आम्ही सुवर्ण पदक जिंकण्याचेच ध्येय घेऊन आलो होतो. सराव शिबिरात आणि या स्पर्धेत आम्ही जे डावपेच आखले होते. त्यानुसार खेळ केला आणि अपेक्षेप्रमाणे गोल्ड जिंकले. संघातील सर्व १५ खेळाडूंचा समन्वय व ताळमेळ अतिशय सुरेख होता. संघात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू असल्याने आमचा संघ विजेतेपदाचा दावेदार होता आणि आम्ही सर्वांचा विश्वास सार्थ ठरवत गोल्ड जिंकले याचा मनस्वी आनंद होत आहे. प्रशिक्षक शिरीन गोडबोले सरांनी कश्या पद्धतीने खेळ करावयाचा हे सांगितले होते. त्यानुसार आमचा स्पर्धेतील खेळ झाला आणि सुवर्ण पदकावर आम्ही शिक्कामोर्तब केले. विजयादशमीची खोखो आणि महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींना आम्ही सुवर्णपदकाची भेट देऊ शकलो यापेक्षा दुसरा आनंद नाही असे ह्रषिकेश मुर्चावडे याने सांगितले.

 196 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.