भारत पेट्रोलियम, महिंद्रा विशेष व्यावसायिक गटाच्या उपांत्य फेरीत

 

शिवशक्ती, डॉ. शिरोडकर, स्वराज्य यांची “स्थानिक महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत” साखळीत दोन विजय मिळवीत बाद फेरीत धडक.

 मुंबई : भारत पेट्रोलियम, महिंद्रा यांनी शिवनेरी मंडळाने आयोजित केलेल्या ” मोहन नाईक चषक” विशेष व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. तर शिवशक्ती, डॉ.शिरोडकर या मुंबईच्या दोन संघा बरोबरच उपनगरच्या स्वराज्य संघाने साखळीत दुसरा विजय मिळवीत ” भागीरथीबाई सावंत” चषकाच्या “स्थानिक महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला.  शिंदेवाडी, दादर येथील भवानीमाता मैदानावर झालेल्या पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारत पेट्रोलीयमने मुंबई महानगर पालिकेच्या प्रतिकार ३३-१९ असा संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली. पहिली पाच मिनिटे ७-७ आशा चुरशीने खेळल्या या सामन्यात नंतर मात्र पेट्रोलीयमने बाजी मारली. मध्यांतराला पेट्रोलीयमकडे २१-११ अशी आघाडी होती. रिशांक देवाडीगा, दिपू या प्रो-कबड्डी स्टार खेळाडूंना थोपविणे अननुभवी पालिकेला जमले नाही. त्यातच नितीन मोरे, रोहित यांनी उत्कृष्ट पकडी करीत पेट्रोलीयमच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. पालिकेकडून राहुल शिरोडकर, वैभव कांबळे, सुरेश जाधव यांनी पूर्वार्धात बऱ्यापैकी प्रतिकार केला. नंतर मात्र ते ढेपाळले. दुसऱ्या सामन्यात महिंद्राने न्यू इंडिया एन्सु.चे आव्हान ४३-२३ असे मोडून काढले. विश्रांतीला २०-१० अशी आघाडी घेणाऱ्या महिंद्राकडून अभिषेक भोजने, स्वप्नील शिंदे यांनी चढाई-पकडीचा उत्तम खेळ केला. न्यू इंडियाकडून सागर सुर्वे चमकला.
  स्थानिक महिला राज्यस्तरीय स्पर्धेच्या अ गटात मुंबईच्या शिवशक्तीने मुंबईच्याच अमरहिंदला ३६-२५ असे नमवित साखळीत दुसरा विजय मिळविला. पहिल्या डावात १२-१३ अशा पिछाडीवर पडलेल्या शिवशक्तीने दुसऱ्या डावात टॉप गिअर टाकत ११ गुणांच्या फरकाने सामना आपल्या बाजूने झुकविला. पूजा यादव, साधना विश्वकर्मा यांच्या झंजावाती चढाया त्यांना साक्षी रहाटेची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हे शक्य झाले. श्रद्धा कदम, दिव्या रेडकर, दिव्या यादव यांनी अमरहिंदकडून कडवी लढत दिली. पण दोन पराभवामुळे अमरहिंदचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. ब गटात मुंबईच्या डॉ. शिरोडकरने रायगडच्या कर्नाळा स्पोर्ट्सचा ३३-२५ असा पाडाव करीत साखळीत दुसरा विजय नोंदविला. शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात शेवटी ८गुणांनी शिरोडकरने बाजी मारली. पूर्वार्धात १३-११ अशी २गुणांची आघाडी शिरोडकरकडे होती. मेघा कदम, साक्षी पवार यांच्या संयमी चढाया त्याला कशिश पाटीलने दिलेली पकडीची भक्कम साथ यामुळे हे शक्य झाले. तेजस्वी इंगळे, नंदिनी वाघे यांनी कर्नाळा स्पोर्टसकडून शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली. पण अनुभवात त्या कमी पडल्या. क गटात साखळीतील दुसरा विजय मिळविताना उपनगरच्या स्वराज्यने धुळ्याच्या शिवशक्तीला ३४-३१ असे नमविले. पूर्वार्धात १३-१४ अशा एका गुणाने पिछाडीवर पडलेल्या स्वराज्यने उत्तरार्धात मात्र आपला खेळ गतिमान करीत विजयाला गवसणी घातली. याशिका पुजारी सानिका इंगळे स्वराज्यच्या विजयाचे शिल्पकार ठरल्या. पूजा कदम, साक्षी पाटील यांनी शिवशक्तीकडून  शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली.

 190 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.