कबड्डी आत्मा तर शरीरसौष्ठव श्वास : विजू पेणकर

आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नसल्याचे सांगून पेणकरांनी एकापेक्षा एक स्फूर्तीदायक शायरी पेश करून उपस्थितांची मनमुराद दाद मिळविली.


मुंबई : आज मी जे काही आहे ते कबड्डी आणि शरीरसौष्ठव खेळामुळे. हे दोन्ही खेळ माझे सर्वस्व आहेत. याच खेळांनी मला नाव आणि लौकिक मिळवून दिलं. म्हणूनच माझ्यासाठी कोणताही एक खेळ मोठा नाही. कबड्डी माझा आत्मा आहे तर शरीरसौष्ष्ठव माझा श्वास आहे. या खेळांनी मला खूप काही दिलंय. आता उर्वरित आयुष्यात मला या खेळासाठी आणि समाजासाठी द्यायचंय, अशी भावना व्यक्त केली आपल्या भारत श्री किताबाची पन्नाशी पूर्ण करणाऱ्या राष्ट्रीय कबड्डीपटू आणि शरीरसौष्ठवपटू विजू पेणकर यांनी.
महाराष्ट्राला पहिलावहिला भारत श्री हे राष्ट्रीय शरीरसौष्ठव अजिंक्यपद पटकावून देणाऱ्या विजू पेणकर यांच्या या सोनेरी कामगिरीचा सुवर्णोत्सव साजरा करण्यासाठी मराठी क्रीडा पत्रकार संघांने विशेष कार्यक्रमाचे माझगाव येथील सर एली कदुरी हायस्कूलमध्ये आयोजन केले होते. या कार्यक्रमात जागतिक शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे यांच्या हस्ते विजू पेणकर यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. तत्प्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत, मराठी क्रीडा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष हरचेकर, कार्याध्यक्ष सुहास जोशी, सचिव संदीप चव्हाण, कोषाध्यक्ष मंगेश वरवडेकर उपस्थित होते.
मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एकाच वेळ दोन खेळांमध्ये खेळणाऱ्या धडाकेबाज आणि जिगरबाज विजू पेणकर यांनी कबड्डीत आपले नाव गाजवल्यानंतर १ ऑक्टोबर १९७२ साली भारत श्री या प्रतिष्ठेच्या किताबावर आपले नाव कोरले होते. ही त्यांची पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा होती आणि त्याच जेतेपदाची पन्नाशी साजरी व्हावी आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाची आठवण ताजी व्हावी म्हणून मराठी क्रीडा पत्रकार संघाने सोनेरी कामगिरीचा सुवर्णोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पेणकरांची ज्येष्ठ पत्रकार अश्विन बापट यांनी जबरदस्त मुलाखत घेतली. या मुलाखतीत बापट यांनी पेणकराना बोलते केले आणि तेही भरभरून बोलले. माझा सुरूवातीचा काळ खूप गरीबीचा आणि हलाखीचा होता. पण माझ्या आईने आम्हाला संघर्ष करायची जिद्द दिली आणि गरीबीला आपली ताकद करण्याची प्रेरणा दिली. आईने दिलेल्या शिकवणीमुळेच दहा बाय दहाच्या घरातून आज मी चार हजार चौरस फूटाच्या घरात पोहोचलोय. आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नसल्याचे सांगून पेणकरांनी एकापेक्षा एक स्फूर्तीदायक शायरी पेश करून उपस्थितांची मनमुराद दाद मिळविली.

 173 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.