सुधागड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
ठाणे : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील आसरे, पो. नवघर येथील शेतकरी अनंता देवराम चव्हाण यांनी कर्जाच्या ओझ्याखाली तणावातून ४ऑगस्ट रोजी त्यांच्याच शेतात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची घडी पूर्णपणे विस्कटली होती. ठाण्यातील सुधागड प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण खोपडे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरेश्वर मित्र मंडळ, आसरे, पो. नवघर येथील संस्थेच्या माध्यमातून लेखी पत्र दिले. मुख्यमंत्र्यांना शेतकर्‍याने आर्थिक संस्था आणि पतपेढीतून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता आल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा रायगड जिल्हाधिकारी पातळीवर पूर्ण तपास करून सदर शेतकर्‍याच्या कुटुंबियांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.
मराठवाडा आणि विदर्भात शेतकर्‍यांचे आर्थिक कर्जबाजारीपणामुळे आत्महत्यांचे प्रमाण आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांनी खचून जावून आत्महत्या न करता सरकारकडे आपले म्हणणे मांडण्याचे आवाहन केले आहे. मात्र कर्जापायी आत्महत्या करण्याची पहिली घटना सुधागड तालुक्यातील घडली असून सुधागड तालुक्यातील आसरे, पो. नवघर येथील शेतकरी अनंता देवराम चव्हाण हे मोलमजुरी कष्ट करूनही घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नसल्याने त्याच्या कुटुंबाची परिस्थिती पूर्णपणे हलाखीची झाल्याने ते तणावात जगत होते. त्यातूनच त्यांनी आपल्या शेतात ४ ऑगस्ट रोजी गळफास घेवून आत्महत्या केली. मात्र त्यांच्या आत्महत्येने कुटुंबावरील कर्जाचा भार कमी झाला नाही. अशा स्थितीत पत्नीही बेरोजगार असून दोन मुलांच्या शिक्षाणाचा खर्चही ती पेलू शकत नाही. तसेच वृद्ध आई-वडील जवळ असल्याने या कुटुंबाची मोठी आर्थिक ओढाताण होत आहे. त्यामुळे विरेश्वर मित्र मंडळ, आसरे व सुधागड प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण खोपडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना लेखी निवेदन देत सदर कुटुंंबाला न्याय देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकरणाची रायगड जिल्हाधिकारी पातळीवर सखोल चौकशी करून सदर कुटुंबाला न्याय देण्याचे आश्वासन दिले.

 253 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.