जिल्ह्यातील ५३५ गुरुंना गुरुपौर्णिमेची अनोखी भेट

मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या निवड श्रेणीचा शिक्षकांना लाभ

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आदेश केले निर्गमित

ठाणे – ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील तब्बल ५३५ प्राथमिक शिक्षकांना प्रलंबित निवड श्रेणीचा लाभ देण्यात आला आहे.  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश निर्गमित केले. या आदेशाने मागील २५ वर्षातील बहुतांश प्रकरणे निकाली काढून सेवानिवृत्त आणि सेवा बजावणाऱ्या ५३५ गुरुजन तथा शिक्षकांना गुरुपौर्णिमेची अनोखी भेट दिल्याची भावना व्यक्त होत आहे.  या निवड श्रेणीचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार देखील प्रयत्नशील होते.

शिक्षकांना शासकीय सेवेत १२ वर्ष पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यात येतो. तर सेवेची २४ वर्ष पूर्ण झाल्यावर निवड श्रेणीचा लाभ दिला जातो. मागील अनेक वर्षापासून अनेक सेवानिवृत्त आणि सेवा बजावणारे शिक्षक या लाभाच्या प्रतीक्षेत होते. या प्रश्नावर पालक मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा गणेश पाटील व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी लक्ष घातले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी या प्रकरणाबाबत तत्परता दाखवत शिक्षकांना लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यानुसार शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) संतोष भोसले यांनी निवड श्रेणीबाबत जलद कार्यवाही करून गुरुवारी या ५३५ शिक्षकांना लाभाचे आदेश निर्गमित करण्यात आले. निवड श्रेणीचा लाभ हा १९८६ पासून आजतागायत पात्र शिक्षकांना देण्यात आला असून यामध्ये सेवानिवृत्त आणि सेवा बजावणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ तालुक्यातील शिक्षकांचा समावेश आहे.  

तालुका निहाय आकडेवारी खालीलप्रमाणे

अंबरनाथ – ६१

कल्याण –  ५५

मुरबाड – ८६

शहापूर – १६७

भिवंडी – १६६  

राष्ट्र उभारणीसाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून पिढी घडविण्याचे कार्य शिक्षक करत असतात. अध्यापनापलिकडे देखील सेवाभावी वृत्तीने शिक्षक कार्यरत असतात. अगदी कोविड काळातही शिक्षकांचे सहकार्य मिळत आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारे सर्व प्रकारचे लाभ त्यांना वेळेत मिळणे गरजेचे असून मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असणारी निवड श्रेणीचा लाभ शिक्षकांना देताना समाधान आणि आनंद होत असल्याची भावना डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील शिक्षकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध : पवार

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यापूर्वी पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना ठाणे जिल्ह्यात नियुक्ती, बहुप्रतिक्षित चटोपाध्याय वेतनश्रेणी आणि आता निवड श्रेणी मिळवून देण्यात आम्हाला यश आले. यापुढील काळातही शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात आम्ही सतर्क राहणार आहोत, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती सुभाष पवार यांनी
दिली.

डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी

२७ नोव्हेंबर २०२० रोजी ऐन कोविडच्या दुसऱ्या लाटेत डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. ग्रामीण भागातील कोविड नियंत्रणासाठी खबरदारीच्या उपाययोजनावर भर देत कोविडवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. सोबतच त्यांनी ग्रामीण भागातील घरकुल, नलजोडणी, जिल्हा परिषदेची मालमत्ता नोंदणीकृत करणे आणि जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीसाठी पाठपुरावा करण्यावर दिला. ग्रामीण जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना, वरिष्ठ वेतन श्रेणी आणि अनुषंगिक कर्मचार्यांचे प्रलंबित प्रश्नही मार्गी लावले. कोणत्याही संस्थेचा पाया हा कर्मचारी असतो. कर्मचारी समाधानी असेल तरच संस्थेची  गतिशील वाटचाल होत असल्याचे डॉ. दांगडे सांगतात.

 294 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.