दुर्गंध जाईल, इतिहास राहील – डॉ.जितेंद्र आव्हाड

ठाणे – मंगळवार २७ जुलै २०२१ या दिवशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत, मुंबईमधील बी. डी. डी. चाळींच्या पुनर्वसनाच्या प्रकल्पाला जेव्हा सुरुवात होईल, तेव्हा मुंबईच्या इतिहासात एक नवं पर्व सुरू होणार आहे. महाराष्ट्राचा गृहनिर्माण मंत्री म्हणून माझा त्याला हातभार असेल, यासारखा काव्यात्मक न्याय मीळेल असे माझ्या आयुष्यात मला कधी वाटले नव्हते

चाळीच्या जीवनातील बरे वाईट पैलू मी ताडदेवच्या एका चाळीत (श्रीपत भवन)लहानाचा मोठा होताना भरपूर अनुभवलेत बाजूला असलेली टाटा कॉलनी आणि तिच्या बद्दलची असूया …चाळ म्हणजे एक मोठं कुटुंब असतं. तिथं घराचे दरवाजे जसे सताड उघडे असतात, तसेच शेजारंच्या मनाचेही. रक्ताचे नातेवाईक देणार नाहीत एवढा प्रेम, जिव्हाळा चाळीत मिळतो.पण त्याची किंमत वेगळ्य प्रकारे मोजावी लागते. मग ती नळावरच्या भांडणात असो, शेजारी चालणाऱ्या अंथोनी च्या हातभट्टीच्या अड्ड्यात असो, बाजू ला चालणारा जानी शेट चा क्लब म्हणजे जुगाराचा अड्डा असो की विष्ठेने भरलेल्या तुंबलेल्या सार्वजनिक संडासात असो. या कडू गोड आठवणी आजही माझ्या मनातून जात नाहीत. हा ईश्वरी संकेत असावा किंवा पवार साहेबांची दूरदृष्टी असावी,मला गृहनिर्माण खातं मिळालं.

वास्तविक गेट वे ऑफ इंडिया , राजाबाई टॉवर , मुंबई विद्यापीठ, किंवा छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस, या इमारतींना जशी एक परंपरा आहे, तशीच ती बी. डी. डी. चाळींना सुद्धा आहे. आश्चर्य वाटेल, पण मुळात ब्रिटिशांनी १९२० च्या सुमारास या चाळी बांधल्या त्या पहिल्या महायुद्धातील युद्धकैद्यांना ठेवण्यासाठी. दरम्यान महारष्ट्राच्या खेडोपाड्यातून स्वातंत्र्या नंतर हजारो कुटुंबं पोटासाठी मुंबईत येत होती. युद्धकैदी परत गेल्यानंतर या कुटुंबांना इथे आसरा मिळाला. दारिद्र्याने गांजलेल्या, पण तरीही जीवनाशी संघर्ष करणाऱ्या मराठी माणसाचा झुंझारपणा यांचे प्रतिक म्हणजे या चाळी आहेत.१९४२ ची चलेजाव चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य, दलित पँथरचा उठाव, गिरणी कामगारांचा संप, अश्या अनेक ऐतिहासिक घटना या चाळीनी पाहिल्या, आणि त्यात त्या तन, मन, धनाने सामील झाल्या.

हे कितीही रोमांचक वाटत असलं, तरी तिथला जगण्याचा स्तर कधी उंचावला नाही आणि चाळींच्या प्लास्टरसारखाच तो दिवसेंदिवस ढासळत गेला, ही सुद्धा नागडी वस्तुस्थिती आहे.

एकूणच मुंबईच्या चाळींमध्ये राहणारे लोक मोठ्या घरांच्या गरजेपायी ठाणे, दहिसर, मानखुर्द च्या पलीकडे फेकले गेले. मुंबईतून हद्दपार झालेल्या या लाखो मराठी माणसापैकी मी सुद्धा एक! पण मुंबईचं मराठीपण आणि तिचा लढवय्या इतिहास नव्या स्वरूपात जतन करायची जबाबदारी नियतीने माझ्यावर टाकली. हाती घेतलं ते पूर्णत्वाला नेल्याशिवाय सोडायचं नाही, ही पवार साहेबांची शिकवण आठवून कामाला लागलो.

 नायगावच्या ४२, एन.एम.जोशी मार्गावरील ३२, आणि वरळीच्या १२१, अशा १९५ बी.डी. डी.चाळी पुनर्विकसित होतील अशी योजना मी आखली.पवार साहेबांचा आशीर्वाद तर होताच, पण १००% हाडाचे मुंबईकर असलेले मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनीसुद्धा माझ्या योजनेला मंजुरी दिली.

गेली २५-३० वर्षे या चाळींच्या पुनर्विकासाच्या चर्चा चालू होत्या. बरेच नारळ फुटले. पण प्रत्यक्षात काहीएक झालं नाही. इथले रहिवासी वर्षानुवर्षे फक्त पुनर्विकासाची स्वप्न पहात दिवस काढत होते. गरिबांच्या प्रश्नांना कोण प्राधान्य देणार? मी आत्मस्तुती करत नाही आहे. पण पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावताना,किंवा चाळीतल्या विविध संघर्ष संघटना ह्यांची समजूत काढून या चाळींसाठी ठोस योजना आखून ती कृतीत उतरवणं हे जिकिरीचं काम होतं. पण ईच्छा असते तिथे मार्ग असतो याचा प्रत्यय मला आला. माझे सर्व सहकारी सुद्धा त्यासाठी खूप राबले.

बी. डी. डी. चाळकऱ्यांना आता, मुंबईतून परागंदा व्हावं लागणार नाही की त्याच कुबट वातावरणात जगावं लागणार नाही. प्रत्येक घरात शौचालय, न्हाणीघर, नळ अशा सुविधा असलेलं, त्यांच्या विद्यमान घरापेक्षा खूप प्रशस्त असं घर, त्यांना महविकास आघाडी सरकारतर्फे मोफत मिळणार आहे.

मी अनुभवलेला घाण संडासांचा, पोटात मळमळ आणणारा दुर्गंध, जिन्यांमधला कोंदट वास हद्दपार होईल. मराठीपण, त्याचा लढवय्या इतिहास, आणि त्याच्या साक्षीदारांच्या पिढ्या तिथे दिमाखात जगतील!

 273 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.