ठाण्यातील खड्ड्यांविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’चे अनोखे निषेध आंदोलन

पुष्पगुच्छ आणि अभिनंदनाच्या फलकाद्वारे प्रशासनाचा निषेध

ठाणे – सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहतूककोंडी सोबतच अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामांबद्दल, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने गुरुवार, दि. २२ जुलै रोजी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. ठाण्याच्या माजीवडा उड्डाणपुलाजवळ हे आंदोलन करण्यात येऊन, “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते” अशा आशयाचा फलक फडकावून निकृष्ट दर्जाच्या बांधकामाद्वारे ठाणे शहराला खड्ड्यात घालणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकारी व ठेकेदारांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन, अनोख्या पद्धतीने यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे शहर संघटक अजय जया यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या निषेध आंदोलनावेळी, पक्षाच्या रिक्षा-टॅक्सी चालक, मालक संघटनेचे सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रशासनाचे अभिनंदन करताना, ढोलताशांचा गजर करण्यात आल्याने, अवघ्या ठाणे शहरात या आंदोलनाची एकच चर्चा रंगली होती.

दरम्यान, सततच्या मुसळधार पावसामुळे ठाणे महापालिकेसह, एमएसआरडीसी आणि एमएसआरडीच्या रस्त्यांची पार चाळण झालेली आहे. पावसाळ्यापूर्वी या तिन्ही प्रशासनांनी त्यांच्या हद्दीतील रस्ते व उड्डाणपुलांवर डांबर किंवा मास्किट अस्फाल्टपद्धतीने डागडुजी केली होती. यामुळे रस्त्यांवर खड्डे पडणार नसल्याचा दावादेखील, संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. मात्र, पावसाळा सुरू होताच, प्रशासनाचा हा दावा सपशेल फोल ठरला. घोडबंदर रोडवर तर उड्डाणपूल आणि खालील बाजूसही खड्डेच खड्डे आहेत. एमएसआरडीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या माजीवडा आणि कापूरबावडी या उड्डाणपुलावर देखील, खड्डे पडलेले आहेत. महापालिकेच्या मीनाताई ठाकरे उड्डाणपुलावरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे, त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वाहतूक कोंडी, तसेच अपघातांच्या घटना तर नित्याच्याच झालेल्या आहेत आणि याला निकृष्ट दर्जाचे काम करणारे संबंधित प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार जबाबदार असल्याच्या निषेधार्थ हे अनोखे आंदोलन ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने करण्यात आल्याचे अजय जया यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.

 267 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.