आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमध्ये उभारला ‘ऑक्सिजन प्लांट’
नागरिकांना मोफत मिळणार ‘ऑक्सिजन सिलेंडर’
दररोज १२० सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती होणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी होणार लोकार्पण
भाईंदर – कोरोना साथीच्या काळात प्रत्येकाला ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायूचे महत्व समजले. ऑक्सिजनच्या बाबतीत प्रत्येक शहराने स्वयंपूर्ण होण्याची गरज असून ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघात कोणत्याही नागरिकांना यापुढे ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर शहरात ऑक्सिजन निर्मिती करणारा कायमस्वरूपी प्राणवायू प्रकल्प (प्लांट) उभारला आहे. एखाद्या आमदाराने जनतेला विनामूल्य ऑक्सिजन देण्यासाठी स्वखर्चातून उभारलेला हा पहिला प्रकल्प आहे. त्याचा गरजू रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा हा प्लांट परदेशातून आला असून , शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी या प्लांटचे लोकार्पण होणार आहे. प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे हा प्लांट उभारला गेला आहे.
संपूर्ण कोरोना काळात कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी , त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी पहिल्या दिवसापासून आमदार प्रताप सरनाईक हे काम करीत आहेत व त्यांनी आजवर विविध उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार,महापालिकांकडून तयारी केली जात आहे. कोरोनासंसर्गासोबत ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढल्याचे दुसऱ्या लाटेत दिसून आले. ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा भासत होता. वेळेवर गरीब , गरजू रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर मिळत न्हवते. त्यामुळे अशा ऑक्सिजन प्लांटचे महत्व खूप आहे.
मीरा भाईंदर मध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले असले तरी अद्यापही कोरोना कायमस्वरूपी हद्दपार झालेला नाही. अनेक रुग्णांचा ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने व वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना संकटाचा सामना करताना मुंबईसह महाराष्ट्रात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन ऑक्सिजन’च्या माध्यमातून राज्याला ऑक्सिजन पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण करण्याचे याआधीच सांगितले होते. त्यामुळे आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या मतदारसंघात ऑक्सिजन निर्माण करणारा हा प्लांट उभारण्याचे काम केले आहे.
२ महिन्यापूर्वी या ऑक्सिजन प्लांटची ऑर्डर सरनाईक यांच्याकडून देण्यात आली होती. परदेशातून हा प्लांट मीरा भाईंदरमध्ये आला आहे. एखाद्या आमदाराने आपल्या मतदारसंघासाठी स्वतः कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट बसविण्याचा हा पहिला प्रयोग आहे. कमीत कमी जागेत हा प्लांट बसविण्यात आला असून २४ तास त्यातून ऑक्सिजन मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक ते ऑपरेटर व हेल्पर यांची नेमणूक केली गेली आहे. या ऑक्सिजन प्लांटमधून मिळणारे ऑक्सिजन नागरिकांना मोफत दिले जाणार आहे. या प्लांट मधून १२० सिलेंडर ऑक्सिजन दिवसाला मिळणार आहे. हे ऑक्सिजन जनतेला विनामूल्य उपलब्ध होणार आहे. रिकामे सिलेंडर घेऊन येणाऱ्या नागरिकांना भरलेले ऑक्सिजन सिलेंडर येथून दिले जाईल. तसेच ज्यांच्याकडे सिलेंडर नसेल त्यांना डिपॉजिट घेऊन विनामूल्य ऑक्सिजन सिलेंडर देण्याची ही योजना आमदार सरनाईक यांनी तयार केली आहे. आमदार सरनाईक यांच्या संकल्पनेतून हा संपूर्ण ऑक्सिजन प्लांट तयार झाला आहे.
‘जनतेसाठी ऑक्सिजन सुविधा विनामूल्य’ – सरनाईक
मीरा भाईंदर येथे मीरा रोड , मंगल नगर , हटकेश येथे प्रताप सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांटचे उदघाटन झाल्यानंतर मतदारसंघातील नागरिकांना मोफत ऑक्सिजन सिलेंडर देण्यास सुरुवात करणार आहोत, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. दररोज निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा पालिका , सरकारी हॉस्पिटल तसेच गरज पडल्यास खासगी हॉस्पिट्लनाही केला जाईल. कोरोना पूर्णपणे हद्दपार होईपर्यंत व त्यानंतरही ही ऑक्सिजन सेवा सुरु राहणार आहे. हवेतून ऑक्सिजन निर्माण करून त्याचे फिल्टरेशन करून ते सिलेंडरमध्ये भरले जाणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी वर्ग यांचीही नियुक्ती केली गेलीय.
२ महिन्यांपूर्वी आमदार सरनाईक कुठे आहेत ? असा प्रश्न विरोधक विचारत होते. तेव्हा आमदार सरनाईक या ऑक्सिजन प्लांट व इतर आरोग्य सेवांची तयारी शांतपणे करीत होते. आमदार सरनाईक यांनी कृतीमधून विरोधकांना उत्तर दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिजन प्लांटसोबतच इतरही अनेक आरोग्य सेवा लवकरच सुरु करणार आहोत , असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
संभाव्य तिस-या लाटेसाठी सज्ज राहा , असे वारंवार केंद्र व राज्य सरकारकडून सांगितले जात आहे. प्रशासनाने तिसऱ्या लाटेला रोखण्याची तयारी केली आहे. अशावेळी आपल्या जनतेसाठी मोफत ऑक्सिजन सेवा सुरु करणारे सरनाईक साहेब पहिले आमदार आहेत , असेही शिवसेना पदाधिकारी म्हणाले.
२६ जुलै नंतर मीरा भाईंदरमध्ये ऑक्सिजन सिलेंडर सेवा सुरु होणार आहे. मीरा भाईंदर ऑक्सिजन सिलेंडरसाठी संपर्क , शिवाजी नाळे – ७७३८७४४७७६
मीरा भाईंदर शहरात आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या आवारात स्वखर्चाने उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटची पाहणी करताना मीरा भाईंदर आयुक्त दिलीप ढोले, सोबत प्रकल्पाची माहिती देताना आमदार सरनाईक
409 total views, 3 views today