धान पिकावरील तुडतुड्यांचे एकात्मिक व्यवस्थापन

ठाणे – भातावर तपकिरी तुडतुडे, हिरवे तुडतुडे आणि पांढरे तुडतुडे असे तीन प्रकारचे तुडतुडे बागायती पाणथळ क्षेत्रामध्ये आढळून येतात. त्यापैकी तपकिरी तुडतुडे सर्वात जास्त हानीकारक आहेत. ही कीड पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात न होणाऱ्या, घन लागवड केलेल्या आणि नत्र खताची मात्रा वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात दिलेल्या शेतात प्रामुख्याने आढळून येते. त्याबरोबर,२८० से. ते ३०० से. तापमान, ८५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता आणि कमी पाऊस या किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक ठरतो. तुडतुडे व त्यांची पिल्ले सतत खोडातील अन्नरस शोषून घेतात त्यामुळे रोपांची पाने पिवळी पडतात. उपद्रव मोठ्या प्रमाणावर असेल तर रोपे वाळतात व जळल्यासारखी दिसतात.  शेतात ठिकठिकाणी तुडतुड्यांमुळे करपून गेलेले गोलाकार भाताच्या पिकाचे खळे दिसतात यालाच “हॉपर बर्न” असे म्हणतात. अशा रोपांना लोंब्या येत नाहीत आणि आल्याच तर दाणे न भरता पोचट राहतात.  

तरी शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे. सर्वेक्षणासाठी प्रत्येक बांधीतील वेगवेगळ्या ठिकाणावरील दहा चुडांची निरीक्षणे  घ्यावीत  व धानाच्या बुंध्यावरील तुडतुड्यांची संख्या मोजून सरासरी प्रति चूड किती तुडतुडे आहेत ते मोजून घ्यावेत. १० तुडतुडे प्रती चूड रोवणी ते फुटवे अवस्थेपर्यंत. १० तुडतुडे प्रती चूड फुटवे ते दुधाळ अवस्थेपर्यंत आढळल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत.

एकात्मिक कीड व्यवस्थापन :

तुडतुडयांचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी लावणी दाट करू नये. दोन ओळीतील अंतर २० सें.मी. आणि दोन चुडातील अंतर १५ सें.मी. ठेवावे तसेच रोपांची पट्टा पध्दतीने लागण करावी. नेहमी प्रादुर्भाव होणाऱ्या शेतात नत्र खताची मात्रा वाजवी प्रमाणात द्यावी. शेतातील पाण्याचा निचरा नियमित करावा, पाणी बदलावे. टेहळणीसाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. प्रत्येक चुडात १० तुडतुडे या आर्थिक नुकसान पातळीच्या आधारे किटकनाशकाची फवारणी करावी. यासाठी हेक्टरी ५०० लिटर पाण्यात इमिडाक्लोरोप्रीड १७. ८ टक्के १२५ मि.ली. किंवा थायामिथॉक्झाम २५ टक्के डब्ल्युजी १०० ग्रॅम किंवा क्लोथीयानिडीन ५० टक्के २५ ग्रॅम किंवा बुप्रोफेजीन २० टक्के + फिप्रोनील ३ टक्के एससी ५०० मि.ली. मिसळून फवारावे किंवा इथोफेनप्राक्स १० टक्के ५०० मि.ली. किंवा फेनोबुकार्ब (बी.पी.एम.सी.) ५० टक्के ६०० मि.ली. या प्रमाणात फवारणी करावी. फवारणी करताना कीटकनाशक फुटव्याच्या बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी. आठवडयानंतर परत प्रादुर्भाव आढळल्यास दोन ते तीन फवारण्या कराव्यात, कीटकनाशके बदलून वापरावीत. अशे विकास पाटील, कृषि संचालक, (विस्तार व प्रशिक्षण), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे कळविले आहे.

 461 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.