भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांचे पत्र
ठाणे – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई व नागपूर महापालिकेच्या धर्तीवर ठाणे शहरात आजारी असलेल्या नागरिकांना घरी जाऊन लस देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपाचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांनी महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण अत्यावश्यक आहे. मात्र, घरात आजारी असलेले बेड रिडन नागरिक व हालचालींवर मर्यादा असलेल्या इतर वृद्धांना लसीकरण केंद्रावर आणता येत नाही. त्यामुळे ठाणे शहरात मोठ्या संख्येने वृद्ध लसीविना राहिले आहेत, याकडे गटनेते मनोहर डुंबरे यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.
मुंबई व नागपूर महापालिकेने आजारी वृद्धांचे घरीच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गरजू वृद्धांची सोय होणार असून, कोरोना लढाईत आणखी बळ येणार आहे. असाच निर्णय ठाणे महापालिकेनेही घेतल्यास गरजू वृद्धांना घरातच लस मिळू शकेल. तरी शहरातील हजारो नागरिकांच्या हिताचा विचार करून आजारी वृद्धांचे घरीच लसीकरण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मनोहर डुंबरे यांनी केली आहे.
540 total views, 3 views today