खासगी कोरोना रुग्णालयांची बनवाबनवी – आ. केळकर यांचा

 
रुग्णांना आणि ठामपाला दिलेल्या बिलात तफावत

पाऊण कोटींचा परतावा थकला

ठाणे –  खासगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांना दिलेली देयके आणि तपासणीसाठी ठाणे महापालिकेला सादर केलेली बिले यात मोठी तफावत आहे. कोविडच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत रुग्णांकडून जादा घेतलेल्या बिलकापैकी ८८लाखांचा परतावा करण्यात आला असून उर्वरित पाऊण कोटींचा परतावा रुग्णांना तातडीने मिळावा, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी दिली.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार खासगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांकडून ठरवून दिलेल्या दरानुसार उपचार शुल्क आकारणे आवश्यक आहे. मात्र पहिल्या लाटेत या रुग्णालयांनी सर्वसामान्य रुग्णांकडून अवाच्या सवा बिले आकारून त्यांची लूट केली. तर रुग्णांच्या नातेवाईकांनी भीतीपोटी ही जादा रकमेची बिले भरली. रुग्णांकडून जादा उकळलेली बिले रुग्णालयांनी परत करावीत यासाठी आमदार संजय केळकर प्रयत्नशील होते. त्यांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा सुरू केला होता. विशेष म्हणजे अनेक रुग्णालयांनी रुग्णांना दिलेली देयके आणि तपासणीसाठी ठाणे महापालिकेला दिलेली बिले यात मोठी तफावत असल्याची बाबही आ. केळकर यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

आमदार केळकर यांच्या  सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महापालिकेने खासगी रुग्णालयांकडून आलेल्या देयकांची तपासणी केली असता एक कोटी ६२ लाख ७३ हजार ५८३ रुपयांची जादा आकारणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी फक्त ८७ लाख ७३ हजार ९५८ एवढी जादा रक्कम रुग्णांना परत केली असल्याचे प्रशासनाने आ. केळकर यांना कळवले आहे. अद्याप ७५ लाख रुपयांचा परतावा रुग्णांना मिळणे बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा परतावा संबंधित रुग्णांना तातडीने मिळावा अशी मागणी केळकर यांनी केली आहे.

 354 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.