ठाणे महापालिकेची ५ लाख लसीकरणाची विक्रमी नोंद – महापौर नरेश म्हस्के

१८ वर्षावरील नागरिकांचा लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे – कोविड नियंत्रण प्रतिबंधात्मक लसीकरण हे ठाणे शहरात अत्यंत सुरळीत व जलदगतीने सुरू आहे. आजपासून १८ वर्षावरील लसीकरण सुरू झाले असून दिवसाला १० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचा आमचा मानस आहे.  शेवटच्या नागरिकांपर्यत लस पोहचविणे हा आमचा उद्देश असून संपूर्ण एमएमआरडीए हद्दीत ५ लाख लसीकरणाचा टप्पा गाठणारी ठाणे ही एकमेव महानगरपालिका असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

 महापालिका कार्यक्षेत्रातील आनंदनगर येथील लसीकरण केंद्रावर महापौर नरेश म्हस्के यांनी भेट देवून लसीकरण कामाचा आढावा घेतला. आज महापालिका क्षेत्रात जवळजवळ ५० ते ५५ लसीकरण केंद्रे सुरू आहेत, दर दिवशी दहा हजार लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शासनाच्या निर्देशानुसार आपण लसीकरण करत असून आजपासून १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण देखील आपण सुरू केलेले आहे, त्यामुळे आपण ५ लाख लसीकरणाचा टप्पा लवकरच गाठणार आहोत अशी माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी दिली.

 आज ठाण्यामध्ये सिनेचित्रपट सृष्टीतील कलावंत तसेच मान्यवर व्यक्ती खाजगी लसीकरण केंद्रावर न जाता महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर जावून लस घेत आहेत, यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगला संदेश जात आहे. आज आनंदनगर लसीकरण केंद्रावर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांनी लसीकरण करुन घेतले, त्याबद्दल महापौर नरेश म्हस्के यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच लसीकरण केंद्रावर काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस व वैद्यकीय कर्मचारी यांचेही महापौरांनी कौतुक करुन आभार व्यक्त केले. जरी आपण सर्वजण लसीकरण करुन घेत असलो तरी कोविडचा धोका हा पूर्णपणे टळलेला नाही. नेहमीप्रमाणेच नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सींगचा अवलंब करणे व महापालिकेने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. विनाकारण सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये असेही आवाहन महापौरांनी ठाणेकरांना केले आहे.

ठाणे महापालिकेचे आनंदनगर लसीकरण  केंद्रांवर अत्यंत शिस्तबदध् पध्दतीने कोणतीही गर्दी न करता नागरिक लसीकरण करुन घेत आहे. तसेच स्वत: महापौर नरेश म्हस्के हे या केंद्रावर उपस्थित राहून सर्व काळजी घेत आहेत. नेते आणि सामान्य माणूस यामध्ये खूप अंतर असते असं अनेकांना वाटतं असते परंतु महापौर नरेश म्हस्के हे जरी शहराचे प्रथम नागरिक असले तरी त्यांचे सहकार्य हे नेहमीच आम्हाला मिळत असते असे अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने यावेळी सांगितले.

 401 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.