पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचा अधिकाऱ्यांना दम 

धोकादायक इमारती, रस्ते दुरुस्ती तसेच साफसफाई कामाबाबत कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचा ईशारा

ठाणे – रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी खड्डे भरणे, धोकादायक इमारती, रस्ते दुरुस्ती तसेच साफसफाईची कामे तात्काळ करण्याचे आदेश देतानाच याबाबत कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचा ईशारा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिला. त्याचप्रमाणे शहरातील खड्ड्यांच्या वस्तू स्थितीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या असून स्वत: महापालिका आयुक्त दोन दिवसांनंतर पाहणीसाठी रस्त्यावर उतरणार आहेत.

 गेल्या काही दिवसात संततधार पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून रस्ते दुरुस्ती, धोकादायक इमारती तसेच साफसफाई कामाचा आढावा घेण्यासाठी आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी तातडीने सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी सध्यस्थितीत पावसाने उसंती दिल्यामुळे सर्व रस्त्यावरील खड्डे भरणे, रस्ते दुभाजक, फुटपाथ दुरुस्तीची कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे कडक आदेश संबंधित अधिका-यांना दिले.  

यावेळी अतिरिक्त आयुक्त(2)संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, मनीष जोशी,  ज्ञानेश्वर ढेरे, नगर अभियंता रवींद्र खडताळे तसेच सर्व सहाय्यक आयुक्त व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

सर्व कार्यकारी अभियंत्यांनी आपापल्या प्रभागात फिरून खड्ड्यांची स्थिती तपासून तात्काळ खड्डे भरण्याच्या अशा सूचना देतानाच खड्ड्यांच्या वस्तुस्थितीचा अहवालही सादर करण्याच्या सूचना त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.

शहरातील खड्डे भरणे, रस्ते दुभाजक, फुटपाथ दुरुस्ती, साफसफाई, मॅनहोल्सची झाकणे बसविणे धोकादायक इमारती खाली करणे, सुशोभीकरण तसेच वृक्ष प्राधिकरण आदी सर्व कामे युध्दपातळीवर करण्याचे कडक आदेश त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले असून महापालिका आयुक्त येत्या दोन दिवसात स्वत: पाहणीसाठी रस्त्यावर उतरणार आहेत.

 423 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.