दिल्लीत शरद पवारांची रणनिती विरोधकांना आणणार एकत्र

राजकारणाच्या पटावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांनी मोठी चाल खेळली आहे.  

 नवी दिल्ली – २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार विरोधकांना एकत्र आणण्याची रणनिती आखत असल्याचं बोललं जात आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवारी दुपारी ४ वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. करोना काळात पहिल्यांदाच विरोधक व्हिडिओ कॉन्फरन्सऐवजी एकत्र बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रमंचच्या माध्यमातून १५ पक्षांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांनाही या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र या बैठकीचे काँग्रेसला आमंत्रण नाही. 

शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार्‍या बैठकीत शरद पवार आणि यशवंत सिन्हा  यांच्यासह काही अन्य नेते सुद्धा सहभागी होणार आहेत. बैठकीशी संबंधीत एका नेत्याने म्हटले की, शरद पवार राष्ट्रमंचाला  काही सल्ले देतील. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बँनर्जींच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडणारे प्रशांत किशोर लोकसभा निवडणूका 2024 साठी विरोधी पक्षांची मोट बांधण्यात व्यस्त झाले असल्याचे दिसत आहे.

तिसऱ्या मोर्चासाठी प्रयत्न सुरू

राष्ट्र मंच हा राजकीय मंच नाही. परंतु भविष्यात या माध्यमांतून भारतीय राजकारणात तिसऱ्या मोर्चाच्या स्थापनेची शक्यता नाकारता येत नाही.

बैठकीत कॉंग्रेसनेते सामिल होणार नाही

शरद पवार यांच्या घरी मंगळवारी राष्ट्र मंचची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कॉंग्रेस नेते उपस्थित राहणार नाहीत. कॉंग्रेसनेते शत्रुघ्न सिन्हा आणि मनीष तिवारी या मंचाचे सदस्य आहेत. परंतु ही बैठक पवारांच्या घरी होणार असल्याने कॉंग्रेस नेते त्याला उपस्थित राहणार नाहीत.

राष्ट्र मंचला ममता बॅनर्जी यांचे समर्थन

राष्ट्र मंचाची स्थापना करणारे यशवंत सिन्हा आता तृणमुल कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. राष्ट्र मंचला आधीच ममता बॅनर्जी यांचे समर्थन आहे. नुकत्याच पश्चिम बंगालच्या झालेल्या निवडणूका लक्षात घेता प्रशांत किशोर यांची त्यात महत्वाची भूमिका होती. त्यामुळे टीएमसीचे समर्थन असलेल्या राष्ट्र मंचच्या माध्यमातून किशोर ममता बॅनर्जींचा चेहरा तिसऱ्या मोर्च्यासाठी पुढे करीत असल्याची  शक्यता नाकारता येत नाही.

 595 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.