आ. संजय केळकर यांच्या प्रयत्नांना यश
ठाणे – दादोजी कोंडदेव स्टेडियम उभारताना सफाई कामगारांची १०४ कुटुंबे विस्थापित झाली होती. त्यांना दिलेल्या पर्यायी इमारती धोकादायक झाल्याने चार वर्षांपूर्वी पाडण्यात आल्या होत्या. तेव्हापासून हक्काच्या घरांसाठी सुरू असलेल्या लढ्याला अखेर आमदार संजय केळकर यांनी सनदशीर मार्गाने विजय मिळवून दिला. आज नवीन इमारतीच्या बांधकामाची सुरुवात त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.
ठाण्यात दादोजी कोंडदेव स्टेडियम उभारताना तेथे राहत असलेल्या सफाई कामगारांच्या वसाहतीला शासकीय जागा देण्यात आली होती. तेथे तीन इमारतींमध्ये १०४ कुटुंबे राहत होती. या इमारतीही कालांतराने अति धोकादायक झाल्याने त्या चार वर्षांपूर्वी पाडून टाकण्यात आल्या. शासनाचा लीज करार १९७० सालीच संपुष्टात आला होता. त्यामुळे पर्यायी जागा आणि पुनर्विकास याबाबत गंभीर समस्या निर्माण झाली होती. गेली चार वर्षे हक्काच्या घरापासून वंचित राहिलेल्या या रहिवाशांसाठी आमदार केळकर यांनी सनदशीर मार्गाचा अवलंब करत पाठपुरावा सुरू केला.
जिल्हाधिकारी, महसूल विभाग आणि ठाणे महापालिका यांच्याशी समन्वय साधत चर्चा-बैठकांच्या माध्यमातून हा प्रश्न केळकर यांनी मार्गी लावला. आज त्यांच्याच हस्ते सर्व रहिवाशांच्या उपस्थितीत नवीन इमारतीच्या बांधकामाची सुरुवात श्रीफळ वाढवून करण्यात आली.
बेघर झालेल्या या कुटुंबांना आता हक्काचे सुंदर घर मिळणार असल्याने रहिवाशांच्या चेहेऱ्यावर समाधान झळकत होते. आमदार संजय केळकर यांनी बेघरांना हक्काचे घर मिळवून दिले. नियत साफ असेल, इच्छाशक्ती असेल तर कठीण कार्यही मार्गी लागते याचे हा प्रकल्प जीवंत उदाहरण आहे, आशा भावना येथील रहिवाशांनी व्यक्त करत त्यांचे आभार मानले.
461 total views, 1 views today