बिल्डरांना ओसी दिल्या पण फायटर व्हेईकल बेपत्ताच

अवघ्या चार वाहनांबाबत कार्यवाही सुरू, अर्चना मणेरा यांनी वेधले लक्ष

ठाणे – बिल्डरांना ओसी देण्याच्या बदल्यात महापालिकेला प्रत्येकी ३ कोटी रुपयांचे मोफत फायर फायटिंग व्हेईकल मिळण्याची प्रतिक्षा अद्यापी कायम आहे. महापालिकेच्या ताब्यात अद्यापी एकही वाहन मिळालेले नसून, बिल्डरांकडून अवघी चार वाहने देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तर आणखी चार वाहने लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे. संबंधित वाहने घेण्याच्या दिरंगाईकडे भाजपाच्या नगरसेविका अर्चना  मणेरा यांनी आजच्या महासभेत विचारलेल्या प्रश्नाद्वारे लक्ष वेधले. त्यानंतर या प्रकरणी शहर विकास विभाग व अग्निशमन विभागाकडून संबंधित बिल्डरांना नोटीसा पाठविण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले.

शहरातील १० लाख चौरस फूटांपेक्षा जास्त बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना ओसी देण्यापूर्वी महापालिकेच्या अग्निशमन दलाला `हाय राईज फायर फायटिंग व्हेईकल’ देण्याचा प्रस्ताव महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी २०१९-२० च्या अर्थसंकल्पीय भाषणाद्वारे जाहीर केला होता. त्यानुसार महापालिकेला ओसी देण्याच्या बदल्यात २५ वाहने मोफत मिळणार होती. त्यातून महापालिकेची ७५ कोटींची बचत होणार होती. त्यावेळी मार्च २०२० अखेर बिल्डरांकडून ८ वाहने मिळणार असल्याचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी आजच्या महासभेत प्रश्न विचारला होता. त्यानुसार प्रत्येकी ३ कोटी रुपये किंमतीची ३३ वाहने महापालिकेच्या अग्निशमन दलाला केव्हा मिळतील, याबाबत विचारणा केली होती. त्यावरील लेखी उत्तरात महापालिकेच्या ताब्यात अद्यापी एकही वाहन आले नसल्याचे उघड झाले.

विशेष नागरी वसाहतीअंतर्गत दोन बिल्डरांकडून चार वाहने हस्तांतरीत करण्याची कार्यवाही सुरू आहे. आणखी चार वाहने लवकरच उपलब्ध होणार आहेत, असे उत्तर महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले. त्यावेळी आयुक्तांनी भाषणात जाहीर केलेली उर्वरित २५ वाहने कोणाकडून येणार आहेत, याबाबतचा तपशील देण्याची विनंती नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे तपशील उपलब्ध नव्हता. अर्चना मणेरा यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीवर महापालिकेचे अधिकारी गोंधळून गेले होते. त्यावेळी महापौर नरेश म्हस्के यांनी शहर विकास विभाग व अग्निशमन दलाला संबंधित बिल्डरांना नोटीसा देऊन माहिती घेण्याचे आदेश दिले.

महापालिका अधिकाऱ्यांचे सोयिस्कर दुर्लक्ष

शहरातील वाढत्या बहूमजली इमारतींची संख्या लक्षात घेता `हाय राईज फायर फाईटिंग व्हेईकल’ची आवश्यकता आहे. त्याबाबत महापालिका आयुक्तांनी धोरण जाहीर केल्यानंतर मोफत वाहने मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्याची आवश्यकता होती. मात्र, त्याकडे महापालिका अधिकाऱ्यांकडून सोयिस्कर व जाणूनबूजून दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोप भाजपाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला. महापालिका आयुक्तांनी ३३ वाहने येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता शहर विकास विभागाकडून काहीही तपशील नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकारात गैरप्रकार होत असल्याची शक्यता नगरसेविका अर्चना मणेरा यांनी व्यक्त केली.

 480 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.