ठाणे – कोरोनाविरोधातील लढाईत आवश्यक असलेली कोरोना प्रतिबंधक लस आज ८० गरजू तरुण-तरुणींना मोफत देण्यात आली. अर्पण फाऊंडेशनच्या अध्यक्षा भावना डुंबरे व भाजपाचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरात उद्योगपती सन्वर कनोरिया व रिशी मोंगा यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
१८ ते ४४ वयोगटातील नागरीकांना लस देण्यास राज्य सरकारने स्थगिती दिली होती. त्याचा फटका परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसला. या पार्श्वभूमीवर अर्पण फाऊंडेशनच्या वतीने पुढाकार घेऊन १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांसाठी हिरानंदानी इस्टेटच्या क्लब हाऊसमध्ये खासगी संकूलातील पहिले लसीकरण शिबिर भरविण्यात आले होते. गेल्या १५ दिवसांपासून या शिबिरामध्ये ३ हजार ५०० हून अधिक नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. त्यात परदेशी जाणाऱ्या १२२ विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या शिबिराचा हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, पातलीपाडा, कोलशेत परिसरातील नागरीकांनी फायदा घेतला. या शिबिराच्यावेळी आर्थिक परिस्थितीमुळे लस घेता येणार नसलेले सुमारे ८० तरुण-तरुणी आढळले होते. त्याची नोंद अर्पण फाऊंडेशनकडून घेण्यात आली होती. याबाबत उद्योगपती सन्वर कनोरिया व रिशी मोंगा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सीएसआर निधीतून लसीसाठी निधी दिला.
गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिरात आज गरजू ८० तरुण-तरुणींना लसीचा पहिला डोस मोफत देण्यात आला. या वेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा भावना डुंबरे यांची उपस्थिती होती. यापुढील काळात अर्पण फाऊंडेशनच्या वतीने विविध विधायक कार्यक्रम राबविणार असल्याचे भावना डुंबरे यांनी सांगितले.
445 total views, 1 views today