ठाणे – केद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू असून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी दिनांक १५ जून २०२१ रोजी ग्रामीण भागातील ११३ केंद्रावर लसीकरण पार पडले. या एकाच दिवशी ५२२९ नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली.
लसीकरणाची गती वाढवण्यासाठी जिल्हात जिल्हा रुग्णालय,उप जिल्हा रुग्णालय,/ग्रामीण रुग्णालय स्तरापासून टप्प्याटप्प्याने प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आता उपकेंद्र स्तरापर्यंत लसीकरण सेवा विस्तारित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ.रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रस्तरावर ग्रामीण आणि नगरपालिका क्षेत्रात हे भव्य लसीकरण घेण्यात आले. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा स्तरावरून नियोजन करण्यात आलेल्या या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमुळे मागील दहा दिवसांच्या दैनंदिन सरासरी पेक्षा पाच पटीने जास्त लसीकरण झाले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे यांनी सांगितले.
उपकेंद्र स्तरावरही लसीकरण
करोना संसर्गाची संभावित तिसरी लाट टाळण्यासाठी आणि कोरोना विषाणू संसर्ग प्रभावीपणे आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करता येण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त उपकेंद्र स्तरावर लसीकरण सत्रं आयोजित करण्यात येणार असून त्याद्वारे जास्तीत जास्त नागरिकांना ही सुविधा सहज उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे असे जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.अंजली चौधरी यांनी सांगितले.
शहापूरमध्ये सर्वाधिक लसीकरण
पाचही तालुक्यांपैकी या एकदिवस मोहीमेत शहापूरकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याने शहापूरमध्ये सर्वाधिक लसीकरण झाले. २५ केंद्रावर झालेल्या लसीकरणामध्ये २००३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तरुलता धानके यांनी दिली.
382 total views, 2 views today