नागरिकांनी व्हॉटसॲपच्या माध्यमातून केलेल्या तक्रारींचा तातडीने निपटारा
ठाणे – ठाणे शहरातील नागरिकांचा महापालिकेच्या कामात सहभाग असावा यासाठी महापालिकेकडून झालेल्या नालेसफाईच्या कामात काही त्रुटी असतील त्या थेट महापौरांना कळवाव्यात त्याबाबत तातडीने दखल घेतली जाईल असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी नागरिकांना केले होते, या आवाहनाला दक्ष नागरिकांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला. महापौरांनी निर्देश दिल्याप्रमाणे प्रशासनाने सुध्दा नागरिकांनी व्हॉटसॲपच्या माध्यमातून केलेल्या तक्रारींचा निपटारा ताबडतोब केल्याबद्दल महापौरांनी प्रशासनाचे कौतुक करीत आभार व्यक्त केले आहेत.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मे महिन्यापासूनच मान्सूनपूर्व कामांना सुरूवात झाली होती. याबाबतची पाहणी स्वत: महापौरांनी करुन त्याबाबत समाधान व्यक्त केले होते. महापौरांनी शहरातील प्रमुख नाल्यांची पाहणी केली होती, परंतु सर्व ठिकाणची पाहणी करणे शक्य नसल्याने सर्व प्रभागसमितीत नालेसफाईची जी कामे सुरू होती ती व्यवस्थित झाली आहेत का? नाल्यातील काढलेला गाळ उचलला आहे का? कि वरचेवर साफसफाई केली आहे, याचे वास्तववादी चित्र कळावे म्हणून महापौरांनी थेट नागरिकांनाच महापालिकेच्या कामात सहभागी करुन घेतले होते.
आपण शहराचे जबाबदार नागरिक आहोत, आपण समाजाचे देणे लागतो, किंवा दक्ष नागरिक या भावनेने नागरिकांनी महापौरांच्या या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद दिला. मुंब्रा, कळवा तसेच ठाणे शहरातील नागरिकांनी आपल्या विभागातील नालेसफाई समाधानकारक न झाल्याचे फोटो हे महापौरांना व्हॉटसॲपच्या माध्यमातून पाठविले. नागरिकांकडून आलेल्या तक्रारी, फोटो हे त्याच दिवशी संबंधित विभागाकडे महापौर कार्यालयाच्या माध्यमातून पाठविण्यात आल्या व प्रशासनानेही तातडीने दखल घेवून ज्या ठिकाणची तक्रार आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन तेथील साफसफाई केली, नालेसफाई करणाऱ्या ठेकेदाराशी संपर्क साधून पुन्हा नाल्याची साफसफाई करुन घेतली. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतल्याबद्दल झालेल्या साफसफाईचे फोटो नागरिकांनी पुन्हा महापौरांना पाठवून त्यांचे आभार व्यक्त केले.
ठाणे शहरातील नागरिकांचे प्रतिनिधीत्व हे महापौर म्हणून मी करीत असतो. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या या सोडविण्याचा प्रयत्न हा सर्व लोकप्रतिनिधी करतात. परंतु नालेसफाई प्रशासनामार्फत केल्यानंतर सुध्दा काही नागरिक हे आपल्या घरातील टाकाऊ वस्तू, फर्निचर या वस्तू नाल्यात टाकून आपली स्वत:ची जबाबदारी झटकून प्रशासनाला दोष देत असतात, त्यामुळेच मी थेट नागरिकांना आवाहन करुन आपणच आपल्या प्रभागातील न झालेल्या नालेसफाईचे फोटो पाठविण्याचे आवाहन केले. एक जबाबदार नागरिक म्हणून नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्या सर्वांचे आभार महापौरांनी व्यक्त केले आहेत. तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी देखील तातडीने दखल घेतली त्याबद्दल उपायुक्त अशोक बुरपल्ले, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर, घनकचरा विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष वझरकर, आपत्कालीन विभागाचे संतोष कदम यांचे आभार व्यक्त केले आहेत.
पावसाळा सुरू असून या काळात एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाशी 02225371010 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच 1800222108 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांना केले आहे.
475 total views, 1 views today
