उदघाटनाआधीच कोपरी पुलास पडले तडे अपघाताची भीती

मनसेची आयआयटीमार्फत ऑडिटची मागणी

ठाणे – वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरलेल्या कोपरी पुलाचे काम पूर्णत्वास येत असून लवकरच उदघाटन होणार असल्याचे कळते, मात्र मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर तडे आणि पुलाखालील भागही कमकुवत असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे. भविष्यात पूल खचून मोठा अपघात होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोपरी पुलाचे चार लेनचे बांधकाम पूर्णत्वास येत असून यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. याच पुलावरून रोज हजारो वाहने विशेषतः अवजड वाहने ये-जा करणार आहेत. या पुलाचे उदघाटन लवकरच होणार असल्याचे कळते. या पुलाची पाहणी आज मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली. यावेळी शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईकडे जाणाऱ्या नव्या कोऱ्या लेनवर आडवे मोठे तडे गेले असून पुलाला असलेल्या काँक्रीटच्या अँटी क्रॅश बॅरिअरलाही तडे गेले आहेत. विशेष म्हणजे पुलाखाली असलेले कपस्टोनही तुटलेले दिसत असून हा भाग कमकुवत झाल्याची माहिती  जाधव यांनी दिली. या पुलावरून रोज शेकडो वाहने ये-जा करणार असून अवजड वाहनेही यावरून जाणार आहेत. त्याचा भार हा निकृष्ट दर्जाचे बांधकाम असलेला पूल घेऊ शकणार नाही. दुर्दैवाने या वाहतुकीने पूल खचलाच तर मोठी जीवितहानी होण्याची भीतीही  जाधव यांनी व्यक्त केली.

या पुलाचे उदघाटन घाईघाईने उरकण्यात येणार असल्याची माहिती आहे. पुलाची दैना पाहता आम्ही हे उदघाटन होऊ देणार नाही, असा इशारा देत जाधव यांनी आयआयटीमार्फत या पुलाच्या बांधकामाचे ऑडिट करण्याची मागणी  केली आहे.

 334 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.