रविराज तावरेंवर गोळी झाडणारे ७ तासात गजाआड एक अल्पवयीन तरुणांसह चौघांना अटक

तावरेंवर दुचाकीस्वारांनी भररस्त्यात गोळीबार केला होता 

बारामती – राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज  यांच्यावर गोळीबार प्रकरणी आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बारामतीत अल्पवयीन तरुणासह चौघांना अटक करण्यात आली आहे. बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या सात तासात आरोपींचा छडा लावला. राजकीय वैमनस्यातून  तावरेंवर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास तावरेंवर दुचाकीस्वारांनी भररस्त्यात गोळीबार केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविराज तावरे हे जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती आहेत. बारामती शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.    एका अल्पवयीन तरुणासह राहुल उर्फ रिबेल यादव, प्रशांत मोरे, विनोद उर्फ टॉम मोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली. बारामती तालुका पोलिसांसह गुन्हे शोध पथकाकडून आरोपींना अटक करण्यात आली. बारामतीच्या इतिहासात प्रथमच एका राजकीय नेत्यावर हल्ल्याची घटना घडली. 

रविराज तावरे पत्नीसह सोमवारी संध्याकाळी सुमारे पावणेसातच्या दरम्यान संभाजी नगर येथे वडापाव घेण्यासाठी गेले होते. अचानक दुचाकीवर येणाऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला त्यात तावरे जखमी होऊन खाली पडले. आणि गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केला तेव्हा जवळच क्रिकेट खेळणारी मुले त्यांच्या गाडीच्या दिशेने धावत आली तो पर्यंत हल्लेखोरांनी पळ काढला.  जखमी अवस्थेतील तावरेंना तातडीने मित्राच्या कारमधून बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवले.

रविराज तावरे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले रविराज तावरे यांच्या पत्नी रोहिणी तावरे या पणदरे-माळेगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. माळेगावची ग्रामपंचायत रद्द होऊन नुकतीच नगरपंचायत झाली. येत्या काही काळात नगरपंचायत निवडणूक होणार आहे. गाव पातळीवरील राजकारणातून हा प्रकार झाला असावा असा संशय आधीपासूनच व्यक्त होत होता.

या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस आणि वैद्यकीय यंत्रणेशी संपर्क साधत सूचना केल्या. या घटनेनंतर माळेगावमधील वातावरण तणावपूर्ण बनले असून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रविराज तावरे यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

 1,019 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.