ग्लोबल कोविड सेंटरमधील ‘त्या’ डॉक्टरांची सेवा अबाधित

ठाणे – कोरोनाचा कहर माजलेला असताना जीवावर उदार होऊन सेवा बजावणाऱ्या सुमारे ४६ डॉक्टरांना अचानक कमी करण्याचा घाट ठाणे महानगर पालिकेने घातला होता. या संदर्भात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आयुक्तांशी चर्चा करुन डॉक्टरांवर अन्याय करु नये, अशी सूचना केली होती. तर, विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर या डॉक्टरांची सेवा अबाधित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मनुष्यबळ कमी पडू लागल्यानंतर ठाणे महानगर पालिकेच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये बीयूएमएस डॉक्टरांना तैनात करण्यात आले होते. सुमारे ६० हजारांपासून सव्वा लाखांपर्यंतची वेतनश्रेणी पालिकेकडून देण्यात येत होती. अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये या डॉक्टर्संनी काम केले होते. त्यामध्ये अनेक डॉक्टरांना तर कोरोनाचीही लागण झाली होती. मात्र, रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर या डॉक्टरांना कमी करण्याचा निर्णय घेतला जात आहे. या डॉक्टरांनी आज शानू पठाण यांची भेट घेतली. त्यावेळी पठाण यांनी हा अन्याय सहन करणार नसल्याचे सांगितले होते. तसेच, पालिका आयुक्तांना निवेदन देऊन या डॉक्टरांची सेवा खंडीत करु नये; अन्यथा.  पालिकेच्या गेटवरच आम्ही आंदोलनाला बसू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर पठाण यांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याशी संवाद साधून डॉक्टरांची सेवा खंडीत होऊ देऊ नका, अशी विनंती केली होती. त्यानंतर डॉ. आव्हाड यांनी पालिका आयुक्तांशी चर्चा करुन डॉक्टरांना ठामपाच्या सेवेतून काढू नये, अशी सूचना केली. त्यांच्या या सूचनेनंतर   पालिका आयुक्तांनी सर्व ४६ डॉक्टरांची सेवा खंडीत न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 276 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.