मीरा भाईंदर मनपा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार जिल्हाधिकाऱ्यांचे खासदार राजन विचारे यांना आश्वासन

ठाणे  – मीरा भाईंदर महानगरपालिकेतील प्रलंबित प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे असल्याने खासदार राजन विचारे व मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन विविध प्रलंबित विषयांवर चर्चा केली. त्यामधील प्रस्ताव मार्गी लावून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी खासदार राजन विचारे यांना दिले.

सदर बैठकीत नगर भवन येथील इमारत जिल्हा परिषदेकडून महापालिकेला हस्तांतरित केल्यास नवीन इमारत उभी करून त्या इमारतीत नागरिकांच्या सोयीसुविधांच्या दृष्टिकोनातून प्रशासनाचे काम सुरू तसेच मंजूर विकास योजनेतील राई येथील आरक्षण क्रमांक ५६ ही मैदानाची जागा सरकारी जागा असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेस हस्तांतरित करावी. जेणेकरून त्या मैदानाचा विकास करता येईल व नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध होतील. यासाठी उप अधीक्षक भूमी अभिलेख ठाणे यांना सदर जागेची त्वरित मोजणी करून अहवाल सादर करण्याचे सांगितले. त्याचबरोबर भाईंदर पश्चिमेकडील पाली गावात जिल्हा परिषदेच्या नावे असलेला दवाखाना व निवासस्थानाची जागा महापालिकेला द्यावी जेणेकरून या परिसरात ४० हजार लोकवस्तीला त्या ठिकाणी दवाखाना उपलब्ध होऊ शकतो. सद्यस्थितीत उत्तन मधील नागरिकांना टेंबा रुग्णालय किंवा इंदिरा गांधी रुग्णालय येथे उपचाराकरिता १० ते १५ किलोमीटर जावे लागते यासाठी आपण तात्काळ जिल्हा परिषदेकडून ही जागा महानगरपालिकेस हस्तांतरित करावी अशी विनंती खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकार्‍यांना केली. तसेच चिमाजी अप्पा स्मारकासाठी व दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला हस्तांतरित करण्यात आली. परंतु सातबारा नावे केले नसल्याने याचे काम सुरु करण्यासाठी विलंब लागत आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर दोन्ही जागा महापालिकेच्या नावे करण्याच्या सूचना अप्पर तहसीलदारांना दिल्या. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेतील ३८६ आरक्षणे असून त्यापैकी २० आरक्षणे ही शासनाच्या जागेवर आहेत. सदर शासनाच्या जागा महापालिकेकडे विकसित करण्यासाठी  मोफत हस्तांतरित करण्याची मागणी केली. त्यावर सदर जागा हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले

भाईंदर उत्तन येथील ३० मी. रुंदीचा रस्ता तसेच घोडबंदर जैसल पार्क हा ६० मी /३० मी. रुंदीचा रस्ता तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेत कांदळवन येत असल्याने सदर कांदळवन बाधित क्षेत्राची ९ हेक्टर जागा ही महापालिकेला वन विभागास हस्तांतरित करावयाची आहे. परंतु मीरा भाईंदर महापालिकेकडे जागा उपलब्ध नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे ९ हेक्टर जागेची मागणी केलेली आहे. सदर जागेची मोजणी झालेली असून बैठकीत जिल्हाधिकारी ठाणे यांनी ९ हेक्टर जागा महापालिकेस देण्याचे मान्य केले आहे.

हटकेश उद्योगनगर येथील ३० मीटर रुरुंदीच्या रस्त्यावर औद्योगिक गाळे असून सदर गाळे धारकांना कायदेशीर कारवाईचा अवलंब केल्याशिवाय काढू नये. असा न्यायालयाचा निर्णय असल्याने महापालिकेने सदर रस्त्याखालील जेगेचे भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधीकारी ठाणे यांना प्रस्ताव पाठविलेला आहे. सदर प्रस्तावानुसार सदर जागेचे त्वरित भूसंपादन करून रस्ता तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यावेळी करण्यात आली.

मीरा रोड पूर्व येथील जोगर्स पार्क येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तात्काळ देण्यात यावी अशी विनंती त्या वेळी करण्यात आली.

उत्तन येथील ७३ एकर जागा जिल्हाधिकारी ठाणे यांनी घनकचरा प्रकल्पासाठी मीरा भाईंदर महापालिकेस दिली आहे. सदर जागेत पशु पक्षांसाठी तसेच कुत्र्यांसाठी उपचार केंद्र, दफनभूमी, स्मशानभूमी करण्याची मागणी त्यावेळी करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

 276 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.