ठाणे मनपा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी लसीकरण केंद्र सुरू करावे – संजय भोईर

ठाणे – ठाणे महापालिका कर्मचाऱयांच्या कुटुंबियांसाठी महापालिका आवारात लसीकरण केंद्र सुरू करून त्यांचे लसीकरण करावे अशी मागणी ठाणे मनपा स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.
 कोरोनाच्या प्रादुर्भावापासून ठाणे महापालिका कर्मचारी नियमितपणे सेवेत कार्यरत आहेत. इतर आस्थापनांना उपस्थित राहण्यासाठी टक्केवारी ठरवून दिली असताना, ठाणे महापालिकेमध्ये १०० टक्के उपस्थिती दिसून येते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी सर्वांना लसीकरण सुरू करण्यात आल्यानंतर महापालिका कर्मचाऱयांना लस देण्यात आली. परंतु त्यांच्या कुटुंबियांचे काय? असा प्रश्न संजय भोईर यांनी उपस्थित करून कर्मचारी कामावरून घरी गेल्यानंतर कुटुंबियांमध्ये वावरतात. अशावेळी बाहेरील संसर्ग कुटुंबातील कुणाला झाला तर त्याचा परिणाम त्या कर्मचाऱयावर होवू शकतो. अशावेळी त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे.
काही शासकीय कार्यालयांबरोबर खाजगी कार्यालये, कंपनीमध्ये असलेल्या कर्मचाऱयांच्या कुटुंबियांसाठी लसीकरण सुरू केले आहे. परंतु ठाणे महापालिकेकडून अशी कोणतीही व्यवस्था केलेली दिसून येत नाही. तरी ठाणे महानगरपालिकेतील कर्मचाऱयांच्या कुटुंबियांसाठी (सर्व वयोगटातील व्यक्तीसाठी) महापालिका आवारात लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी विनंती  भोईर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

 286 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.