शेतकर्यांना मोबदला देऊन १,२५० मीटरचा नाला बांधा- शानू पठाण
ठाणे – दिवा प्रभाग समितीच्या अंतर्गत असलेल्या शिळ आणि खर्डी गावांमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. त्यातच हा भाग सखल असल्याने या ठिकाणी थोड्याशा पावसातही मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे येथील शेतकर्यांना योग्य तो मोबदला अदा करुन खाडीला जोडणारा एक हजार २५० मीटर लांबीचा नाला बांधण्यात यावा, अशी सूचना विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी केली
विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी आज दिवा प्रभाग समितीअंतर्गत असलेल्या नाल्यांच्या सफाईचा आढावा घेतला. त्यांनी ठामपाच्या अधिकार्यांसह दिवा प्रभाग समितीमध्ये सुरु असलेल्या नालेसफाईची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेविका हिरा पाटील, गणेश मुंडे आणि स्थानिक नागरिक आदी उपस्थित होते.
या पाहणीमध्ये खर्डी, शिळ या गावांमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्थाच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. छोट्या-छोट्या गटारांच्या माध्यमातून पावसाचे पाणी वाहून नेले जात आहे. त्यातच हा भाग सखल असल्याने थोड्याशा पावसातही या भागात प्रचंड पाणी तुंबत आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात त्याची प्रचिती आल्याचे स्थानिक गावकर्यांनी पठाण यांना सांगितले. त्यानंतर, या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी १ हजार २५० मीटर नाल्याची बांधणी करणे गरजेचे आहे. या नाल्याच्या बांधकामात स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी जाणार असल्याने त्यांना विश्वासात घेऊन त्यांना योग्य मोबदला देऊन नाल्याची बांधणी करावी; नाल्याची बांधणी पूर्ण होईपर्यंत चर खोदून तुंबणार्या पाण्याला वाट मोकळी करुन द्यावी, अशी मागणी पठाण यांनी केली.
दरम्यान, या नाल्याच्या बांधकामासाठी आपण गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही पठाण यांनी सांगितले.
520 total views, 2 views today