सर्वसाधारण सभेत काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांनी प्रशासनाला धरले धारेवर
ठाणे – ठाणे महापलिकेच्या अनेक प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त उत्तम पध्दतीने काम करत असतानाही त्यांना एकच सुरक्षारक्षक आहे.मात्र, दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना डझनभर अंगरक्षक का ? पदरी अंगरक्षक ठेवून भिती दाखवण्याचे काम दिव्यात सुरू नाही ना ? असा भडीमार करीत बुधवारच्या वेबिनार महासभेत काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी प्रशासनाला धारेवर धरले.दिव्यात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू असून वारंवार तक्रार करूनदेखील कारवाई का केली जात नाही.असा सवालदेखील चव्हाण यांनी केला.दरम्यान,नियम डावलून सुरक्षारक्षक दिले असतील तर,काढून घ्या.अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी प्रशासनाला केली.
दिव्यासह ठाणे शहरात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत.एकीकडे कोरोनाने सर्वत्र यंत्रणा व्यस्त आहेत, त्यामुळे अनधिकृत बांधकामाकडे कोणाचे लक्ष नाही. त्यातच पावसाळा तोंडावर आला असून एखादी दुर्घटना घडली तर, याला जबाबदार कोण ? असा सवाल विक्रांत चव्हाण यांनी उपस्थित केला. मुंब्रा,दिवा परिसरात मोठ्या प्रमाणावर इमारतीवर मजलेच्या मजले उभे राहत असल्याकडेही विक्रांत चव्हाण यांनी लक्ष वेधले.
कोणत्याही परवानगीशिवाय उभी राहत असलेली ही अनधिकृत बांधकामे भविष्यात डोकेदुखी ठरणार असून सध्याच्या घडीला दिव्यातच अनधिकृत बांधकामे का आणि कशी उभी राहत आहेत.या प्रभागत अनधिकृत बांधकामे संदर्भात तक्रारी करणाऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली जात असून,रातोरात गायब केले जात असल्याचा धक्कादायक आरोपही यावेळी विक्रांत चव्हाण यांनी केला.यासाठी हे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त पदरी अंगरक्षक बाळगून तेथील स्थानिकांना धकमावत असल्याचेदेखील चव्हाण यांनी सांगितल्याने ठाणे महापालिकेच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
438 total views, 1 views today