आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर साडेसात कोटींच्या कामास सुरुवात
ठाणे – ठाण्यातील जरीमरी नवीन पोलीस गृह संकुलातील १२५ हून जास्त पोलीस कुटुंबे पाणी गळतीमुळे हैराण होती. याकरिता निधीही मंजूर करण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे या कामास ब्रेक लागला होता. स्थानिक आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर साडेसात कोटींच्या दुरुस्ती कामास सुरुवात झाली आहे. पोलीस कुटुंबांना भेडसावणाऱ्या या समस्येचा निकाल लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
महाराष्ट्र पोलीस गृह निर्माण व कल्याण महामंडळातर्फे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी जरीमरी येथे सूर्य, रवी, आदित्य, अरुण आणि भास्कर या १३ मजली पाच इमारती बांधण्यात आल्या आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये ५२ याप्रमाणे २६० सदनिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सदनिकेला गरम पाण्यासाठी टेरेसवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. त्याच्या जलवाहिन्या भिंतीतून सदनिकेपर्यंत नेण्यात आल्या आहेत. मात्र या वाहिन्या फुटून पाण्याची गळती होत आहे. यामुळे सुमारे १२५ सदनिकांच्या भिंती वर्षभर ओल्या राहत असून बाथरूममध्येही मोठ्या प्रमाणात पाणी गळती आहे. पोलिसांना उत्तम प्रतीची घरे मिळाली असली तरी पाणी गळतीने ही कुटुंबे हैराण आहेत.
या समस्येबाबत स्थानिक आमदार संजय केळकर यांच्याकडे माजी नगरसेवक संतोष साळवी यांनी माहिती दिल्यानंतर केळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानुसार २०१८ पासून त्यांनी गृह विभागाकडे दुरुस्तीसाठी पाठपुरावाही सुरू केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून अखेर या कामासाठी विभागाकडून साडेसात कोटींची तरतूदही मंजूर झाली, मात्र त्यांनतर आलेले कोरोना आणि लॉकडाऊनचे संकट यामुळे हे काम रखडले.
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आल्याने दुरुस्तीचे काम प्राधान्याने आणि तातडीने हाती घेण्यात यावे, अशी भूमिका आ. केळकर यांनी घेतल्याने गृह विभागाकडून हे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. आज गुरुवारी या दुरुस्ती कामाचा शुभारंभ आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झाला. या दुरुस्तीमुळे पोलीस कुटुंबाचे होणारे आर्थिक नुकसान यापुढे टळणार असल्याने त्यांनी केळकर यांचे आभार मानले आहेत. यावेळी ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन चे अध्यक्ष सीताराम राणे उपस्थित होते.
539 total views, 2 views today