ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोरोना संसर्गाचा अटकाव करण्यासाठी गावोगावी जनजागृती
ठाणे – ग्रामीण भागातील कोरोनाला अटकाव करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबरोबरच व्यापक प्रमाणात जनजागृतीही केली जात आहे. विविध प्रकारचे प्रसिद्धी साहित्य तयार करून त्याद्वारे लोकजागृतीचे काम केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून नुकतेच जिल्हा परिषदेने पोतराज ही ध्वनी चित्रफीत प्रदर्शित केली असून हा पोतराज कोरोनाला अटकाव करण्यासाठी नागरिकांनी पाळावयाचे नियम सांगत आहे.
ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य विभागासह, ग्रामपंचायत, महिला व बाल विकास, शिक्षण आदी विभागाचे कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. खबरदारीच्या उपाययोजनासोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीचे कामही नियमितपणे सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून एरवी गोवोगांवीं चाबूक अंगावर मारत भिक्षूकी करणारा पोतराज , कोरोना गावात शिरू नये म्हणून गावकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याची माहिती सांगत आहे. अशा स्वरूपाची ही ध्वनीचित्रफीत तयार करून गावांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद करत आहे. यासाठी गर्जा प्रतिष्ठान मुरबाड या संस्थेचे विशेष सहकार्य मिळाले आहे. या चित्रफितीची निर्मिती हि गर्जा प्रतिष्ठान या संस्थेने केली असून लेखन योगेंद्र बांगर व दिग्दर्शन नितेश मंगल डोंगरे यांनी केले आहे. समीर खुटारे या मुरबाडच्या मातीतील सुप्रसिद्ध कलावंताने पोतराजाची भूमिका अगदी लीलया पेलली आहे. या चित्रफितीचे छायाचित्रण संदीप देशमुख, वेशभूषा : भूषण मोरे. रुपेश खाटेघरे, रंगभूषा : वैजयंता डोंगरे, निर्मिती साहाय्य : सचिन थोरात, संदीप खरे यांनी केले आहे. या चित्रफितीचे कौतुक संपूर्ण महाराष्ट्रभरातून होत आहे.
जनजागृतीसाठी विशेष टीमची नियुक्ती
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या संकल्पनेनुसार जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क कक्ष ( सामान्य प्रशासन विभाग) माध्यमातून व्यापक स्वरूपात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. कोरोना प्रतिबधक उपाययोजना आणि लसीकरणबाबत विविध प्रकारचे जनजागृती साहित्य तयार करून जिल्हात सकारात्मक वातावरण निर्माण केलें आहे. लोकांमधील भीती कमी करून कोरोना काळात कोणती खबरदारी घेणे गरजेचे आहे, याबाबत पोस्टर, ग्राफिक्स, व्हिडिओ, जिंगल, आदी स्वरूपात प्रचार साहित्य तयार केले जात आहे. आतापर्यंत दवंडी, लघु चित्रफीत, गाणी, मिमन्स, छोटे स्टेटस व्हिडिओ, ऍनिमेशन व्हिडिओ, आवाहन करणारे व्हीडिओ तयार करण्यात आले आहेत. तसेच बोलका बाहुला, किर्तन, पोतराज आदी प्रकार वापरून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे सहकार्य मिळत आहे. काही निवडक शिक्षकाची टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये योगेंद्र बांगर, अजय पाटील, प्रमोद पाटोळे, सत्यवान शिरसाठ, अलंकार वारघडे, नटराज मोरे, विद्या शिर्के, जयवंत भंडारी यांचा समावेश आहे.या टीमला अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ.रुपाली सातपुते , उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सा.प्र) अजिंक्य पवार, शिक्षणाधिकारी संतोष भोसले मार्गदर्शन करत आहेत.
436 total views, 2 views today