ठाणे – ठाणे महानगर पालिकेच्या वेबिनार महासभेत प्रशासनाच्या विरोधात बोलणार्या नगरसेवकांचा आवाज म्यूट केला जातो; प्रशासनाच्या विरोधात बोलणार्या विरोधी पक्षनेत्यांना पोलीस बळाचा वापर करुन ताब्यात घेतले जाते. एकूणच ठामपामध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हुकूमशाही प्रकार सुरु आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिता सातपुते आणि फरझाना शाकीर शेख या दोन नगरसेविकांनी पालिका आयुक्तांसमोर आंदोलन केले.
“उल्टा चोर, कोतवाल को डाटे” असे शब्द लिहिलेला बॅनर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिता सातपुते आणि फरझाना शाकीर शेख या दोन नगरसेविकांनी गुरुवारी पाच वाजेच्या सुमारास पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या दालनासमोर आंदोलन केले.
कोरोनाच्या नावाखाली वेबिनार पद्धतीने महासभेचे आयोजन करण्यात येत आहे. ही महासभा म्हणजे प्रशासनाच्या हातातील बाहुले झाले आहे. जे नगरसेवक पालिका प्रशासनाला टार्गेट करतात. त्या नगरसेवकांचा आवाज म्यूट करण्यात येत असतो. त्यामुळे प्रभागातील समस्या सभागृहापुढे मांडताच येत नाहीत. जनतेच्या कामांसाठी प्रशासनासमोर लोटांगण घालावे लागते. मात्र, प्रशासन कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नाही. चक्रीवादळानंतर ठाणे शहरात अनेक झाडे उन्मळून पडली. मात्र, त्यांचा कचरा उचलला जात नाही. त्याविरोधात आंदोलन करणार्या विरोधी पक्षनेत्यांना पोलिसांच्या साह्याने ताब्यात घेऊन महासभेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. हा सर्व प्रकार हुकूमशाहीचे द्योतक आहे. आम्ही ही हुकूमशाही सहन करणार नाही. विरोधी पक्षनेत्यांनी जनतेच्या मागणीसाठी आंदोलन केल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर, आता आम्हालाही ताब्यात घ्यावे, असे म्हणत सुनिता सातपुते आणि फरझाना शेख यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी केली.
दरम्यान, पुढील महासभेत असे प्रकार झाले तर ते सहन करण्यात येणार नाहीत. कोरोनामुळे आज आम्ही दोनच नगरसेविकांनी हे आंदोलन केले आहे. या पुढे या हुकूमशाहीच्या विरोधात दिवसआड दोन नगरसेवक असेच आंदोलन करणार असून पुढील महासभेला सर्वच नगरसेवक सभागृहाच्या बाहेर धरणे आंदोलन करतील, असा इशाराही यावेळी सातपुते यांनी दिला.
484 total views, 2 views today