झाडांच्या फांद्यांसह महासभेत प्रवेश करण्याचा विरोधी पक्षनेत्यांचा प्रयत्न वृक्ष प्राधिकरण करतेय बिल्डरांसाठी काम – शानू पठाण

एकट्या पठाण यांच्या आंदोलनाला अटकाव घालण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा


ठाणे –  गेल्या तीन दिवसांपासून ठाणे शहरात ओला कचरा आणि झाडांचा पाला पाचोळा पडला असून अद्याप महापालिकेने तो कचरा उचलला नाही. ओला कचरा तीन दिवस तसाच पडून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी चक्क झाडांच्या फांद्या घेऊन महासभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ठामपाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेशद्वारावरच अडवले. तसेच, एकट्या पठाण यांच्या आंदोलनाला अटकाव घालण्यासाठी पालिका प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला  होता.
चक्रीवादळानंतर ठाणे शहरात शेकडो झाडे उन्मळून पडली. तसेच, हजारो झाडांच्या फांद्या कोसळल्या आहेत. मात्र, रस्त्यावर पडलेल्या या झाडांच्या फांद्यांचा कचरा ठामपाच्या घनकचरा आणि वृक्षप्राधिकरण खात्याने उचलेल्या नाहीत. त्यामुळे हा ओला कचरा रस्त्यावर पडलेला असल्याने दुर्गंधी तर पसरली आहेच; शिवाय, वाहनांचे अपघातही होत आहेत. हा ओला कचरा तत्काळ हटवावा, या मागणीसाठी शानू पठाण हे राष्ट्रवादीचे ठाणे युवाध्यक्ष विक्रम खामकर यांच्यासह आपल्या गाडीतून चक्क झाडांच्या फांद्या घेऊन ठामपा मुख्यालयात आले. त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे सुरक्षा यंत्रणेची पुरती पळापळ झाली. या फांद्या घेऊन महासभेमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच सुरक्षा रक्षकांनी त्या फांद्या ताब्यात घेतल्या. त्याममुळे पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी पठाण यांनी प्रवेशद्वारासमोरच आंदोलन सुरु केले. अखेर नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पठाण आणि खामकर यांना ताब्यात घेतले.  
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, वृक्षप्राधिकरण खात्याने फेब्रुवारीपासून अनेक नागरिकांनी धोकादायक झाडांच्या तक्रारी केल्या आहेत. मात्र, बिल्डरांच्या फायद्यासाठी काम करणारे हे खाते नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहेत. झाडांनी छाटणी न केल्यामुळेच चक्रीवादळानंतर वृक्षांची पडझड झाली आहे. आज ठाणे पालिकेची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. तरीही, बिल्डरांकडून येणारा 22 कोटींचा दंड वसूल केला जात नाही. त्यामुळे अशा अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.  


दहावेळा तुरुंगात जाण्याची तयारी- पठाण
आज ठाणेकरांच्या आरोग्यासाठी आपण एकट्याने आंदोलन केले. आपण आणलेल्या एका फांदीला ठाणे पालिका प्रशासन एवढे घाबरले की त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यातून तात्काळ फौजफाटा बोलाविला. अशीच तत्परता प्रशासनाने झाडांचा कचरा हटवण्यासाठी दाखविला असता तर मला आणि ठाणेकरांना आंदोलनाचा मार्ग अनुसरावा लागला नसता. ठाणेकरांसाठी आंदोलन केल्याने मला जर अटक केली जात असेल तर मी अशा पद्धतीने दहावेळा तुरुंगात जाण्यास तयार आहे.असे शानू पठाण याने माध्यमांशी बोलताना सांगितले. 

 398 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.