नगरसेवक निधीत कपात, प्रभागातील विकासकामे ठप्प !
पालकमंत्री व गृहनिर्माणमंत्र्यांनी ठामपासाठी शासनाकडून आर्थिक पॅकेज आणावे – उमेश पाटील
ठाणे – कोरोना लाॅकडाऊनमुळे ठाणे महापालिकेत आर्थिक आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे नगरसेवकांना मिळणाऱ्या नगरसेवक निधीत कपात झाली आहे. याचा थेट फटका प्रभागातील विकासकामे ठप्प होण्यात झाला आहे. या दुष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेला या आर्थिक विवंचनेतुन बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाकडे आर्थिक पॅकेजची मदत मागावी, अशी सूचना शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक उमेश पाटील यांनी केली आहे.
ठाणे महापालिकेतील नगरसेवकांना, नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा निधी व मागसवर्गीय निधी, प्रभागातील विकास कामांसाठी दिला जातो. पण २०-२१ या आर्थिक वर्षांत नगरसेवकांना, एका रुपयाचाही नगरसेवक निधी मिळाला नसल्याने, नगरसेवकांच्या शब्दांवर कामे केलेल्या ठेकेदारांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. यामुळे हे ठेकेदार चक्क नगरसेवकांच्या घरी व कार्यालयात पेमेंटसाठी फेऱ्या मारताना दिसत आहेत. ठेकेदारांनी जवळपास ६० ते ७० टक्के कामे केलेली आहेत पण आता नगरसेवक निधीतील कपातीमुळे ठेकेदारांना पेमेंट मिळत नसल्याने ते उर्वरित कामे करण्यास उत्सुक नाहीत. यामुळे निधी अभावी प्रभागातील ही सर्व विकासकामे रखडलेली आहेत, असे उमेश पाटील यांनी सांगितले.
कोरोना लाॅकडाऊन मुळे महापालिकेकडे आवश्यक तेवढा महसूल गोळा होत नसल्याचे ठाणे महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा सांगत आहेत. दर महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत होणारे कर्मचाऱ्यांचे वेतनही थकून आता १० तारखेनंतर होऊ लागले आहेत. ठाणे महापालिकेतील ही आर्थिक आणिबाणी संपविण्यासाठी ठाण्यातील दोन मंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घ्यावा आणि महाराष्ट्र शासनाकडे ठाणे महापालिकेसाठी आर्थिक पॅकेजची मागणी करावी आणि ठाणे महापालिकेला या आर्थिक आणिबाणीतुन बाहेर काढण्यास मदत करावी, असे आवाहन उमेश पाटील यांनी केले आहे.
521 total views, 1 views today